कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 01:37 PM2019-09-11T13:37:34+5:302019-09-11T13:37:51+5:30
फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे कृषी विभागाच्या चमूद्वारे बुधवारपासून करण्यात येणार आहेत.
- संतोष येलकर
अकोला: पिकांवर कीटकनाशकांच्या फवारणीतून जिल्ह्यात शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे कृषी विभागाच्या चमूद्वारे बुधवारपासून करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या घरी जाऊन घटनांची माहिती घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यात कपाशी व सोयाबीन पिकावर विविध कीड व रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवरील कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी-शेतमजुरांकडून कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे; परंतु जिल्ह्यात गत दोन महिन्यांच्या कालावधीत कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. जिल्ह्यातील विविध भागात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने, १० सप्टेंबरपर्यंत १३८ शेतकरी -शेतमजुरांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. कीटनाशकांच्या फवारणीतून विषबाधाच्या घटना वाढल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील विषबाधाच्या घटनांचे पंचनामे जिल्हा कृषी विभागाच्या चमूद्वारे ११ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या घरी जाऊन, त्यांच्याकडून विषबाधा घटनेची माहिती घेण्यात येणार आहे. कृषी विभागांतर्गत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितींचे कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, सत्र अधिकारी, मोहीम अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या चमूद्वारे विषबाधाच्या घटनांचे पंचनामे करण्यात येणार असून, त्यामध्ये घेण्यात आलेल्या माहितीचा अहवाल सात दिवसांत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
पंचनाम्यात अशी घेण्यात येणार माहिती!
कृषी विभागाचे अधिकारी विषबाधा झालेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या घरी जाऊन विषबाधाच्या घटनांचे पंचनामे करणार आहेत. त्यामध्ये कोणते कीटनाशक फवारणी करताना विषबाधा झाली, विषबाधेचे कारण कोणते होते, कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा होऊ नये म्हणून आवश्यक असलेल्या उपाययोजना केल्या होत्या काय, यासंदर्भात माहिती घेण्यात येणार आहे.
१३८ शेतकऱ्यांना विषबाधा; २८ शेतकºयांवर उपचार सुरू!
जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने १० सप्टेंबरपर्यंत १३८ शेतकरी-शेतमजुरांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी ११० शेतकºयांना उपचारानंतर सुटी देण्यात आली असून, विषबाधा झालेल्या २८ शेतकरी-शेतमजुरांवर अद्याप सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याच्या घटनांचे पंचनामे ११ सप्टेंबरपासून कृषी विभागाच्या अधिकाºयांमार्फत करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विषबाधा झालेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या घरी जाऊन विषबाधेच्या घटना व कारणांची माहिती घेण्यात येणार आहे.
- मिलिंद जंजाळ
मोहीम अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद