अकोला जिल्ह्यात घरांसह पीक नुकसानीचे पंचनामे सुरु !
By संतोष येलकर | Published: July 20, 2023 05:47 PM2023-07-20T17:47:42+5:302023-07-20T17:47:57+5:30
पाऊस अन् पुराचा तडाखा : शेकडो घरांची पडझड; हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान
अकोला: जिल्हयात मंगळवारी रात्री बसरलेला जोरदार पाऊस आणि नदी नाल्यांना आलेल्या पुराच्या तडाख्यात शेकडो घरांची पडझड झाली असून, हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत घरांसह पीक नुकसानीचे पंचनामे गुरुवारपासून सुरु करण्यात आले.जिल्हयातील सातही तालुक्यात १८ जुलै रोजी रात्रभर जोरदार पाऊस बरसला असून, तेल्हारा तालुक्यासह आठ महसूल मंडळांच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. धो धो पाऊस आणि त्यामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुराच्या तडाख्यात जिल्हयातील विविध भागात शेकडो घरांचे नुकसान झाले.
नदी नाल्याकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी घरांत घुसल्याने अनेक घरांतील साहित्याचे नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणी शेकडो हेक्टर शेतजमीन पिकांसह खरडून गेली असून, पाण्यात बुडालेल्या हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस व पुराच्या तडाख्यात घरांचे पूर्णत: नुकसान झालेल्या बाधीत कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांसह पीक नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक इत्यादींच्या पथकांव्दारे सुरु करण्यात आले.
४५ घरांचे पूर्णत: २१० घरांचे अंशत: नुकसान !
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक अहवालानुसार पाऊस आणि पुरामुळे जिल्हयातील मूर्तिजापूर तालुक्यात ४५ घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून, २१० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. यासोबतच जिल्हयातील विविध भागातही घरांची पडझड झाली आहे.
खरडून गेलेली जमीन; पीक नुकसानीचा असा आहे प्राथमिक अंदाज !
पाऊस आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयातील विविध भागात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तथापी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्हयातील मूर्तिजापूर , बार्शिटाकळी व अकोला या तीन तालुक्यांत ५१५ हेक्टर शेतजमीन खरडून गेली असून, १४ हजार २९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यात ८ हजार २९० हेक्टर, बार्शिटाकळी तालुक्यात २ हजार ६० हेक्टर आणि अकोला तालुक्यात ३ हजार ९४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पंचनाम्यांत समोर येणार नुकसानीचे वास्तव !
नुकसान झालेल्या घरांसह पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु करण्यात आले आहे. पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हयातील घरांच्या नुकसानीसह पीक नुकसानीचे वास्तव समोर येणार आहे.