‘पंदेकृवि’च्या शास्त्रज्ञांची राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादामध्ये भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:19 AM2021-04-04T04:19:09+5:302021-04-04T04:19:09+5:30
फोटो 04aklcity.dr.yogesh ingle अकोला : इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी व भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ...
फोटो 04aklcity.dr.yogesh ingle
अकोला : इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी व भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वनस्पती आरोग्य आणि अन्न सुरक्षा आव्हाने आणि संधी’ या विषयावर आभासी राष्ट्रीय परिसंवाद २५ ते २७ मार्च या कालावधीत झाला. या राष्ट्रीय परिसंवादामध्ये देशाच्या विविध राज्यांतून ३०० पेक्षा अधिक वनस्पती रोगशास्त्रज्ञ सहभागी झाले. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्रज्ञांनी उत्कृष्ट सादरीकरणाकरिता प्रथम व तिसरा क्रमांक पटकाविला.
या राष्ट्रीय परिसंवादात वनस्पती रोगशास्त्र तसेच संलग्नविषय जसे कृषी जैवतंत्रज्ञान, जैविक कीड नियंत्रण, सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील संशोधन शोधपत्रिका प्रसिध्द करण्यात आल्यात तसेच मौखिक व भीत्तिपत्रिकाव्दारा संशोधन प्रसारित करण्यात आले व यामध्ये देशातील इतर कृषी विद्यापीठांतील वनस्पती रोगशास्त्रज्ञांनी आपले निरनिराळ्या सत्रामध्ये सादरीकरण केले. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञांनी रोग व्यवस्थापनासाठी अपारंपरिक रसायनांचा वापर या सत्रात आपले संशोधन सादर केले. या सत्रात विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. योगेश वि. इंगळे यांनी ‘लिंबूवर्गीय फळपिकातील रोपवाटिकेमधील मूळकूज रोगाचा अपारंपरिक रसायनांचा वापर करून केलेले नियंत्रण’ तर धीरज वसुले यांनी ‘सोयाबीन पिकातील शेंगेवरील करपा रोग व्यवस्थापन’ या विषयावर संशोधनाचे सादरीकरण केले. उत्कृष्ट सादरीकरण व संशोधन याकरिता पुरस्कार देण्यात आले असून यामध्ये डॉ. योगेश वि. इंगळे यांना तिसऱ्या सत्रातील उत्कृष्ट सादरीकरणाकरिता प्रथम क्रमांक तर धीरज वसुले यांनी तिसरा क्रमांक पटकावला. विद्यापीठातील युवा शास्त्रज्ञांना कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे प्रोत्साहन तर संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांचे सहभाग घेण्याकरिता सतत पाठपुरावा व मार्गदर्शन मिळत असते. याकरिता शास्त्रज्ञांनी विद्यापीठातील विभागप्रमुख (वनस्पती रोगशास्त्र) व अधिकारी वर्ग यांचे आभार मानले.