पंदेकृवि : अखेर उपोषणाची समाप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:47 AM2017-10-07T02:47:34+5:302017-10-07T02:48:40+5:30
अकोला : ‘समान काम समान वेतन’ मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी कर्मचार्यांनी मागील पावणे दोन महिन्यांपासून पुकारलेले बेमुदत काम बंद आंदोलन व उपोषण अखेर शुक्रवारी मागे घेण्यात आले. राहणीमान भत्ता फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देऊन,समान वेतनाची मागणी शासन दरबारी रेटण्याचे आश्वासन कृषी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कर्मचार्यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘समान काम समान वेतन’ मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी कर्मचार्यांनी मागील पावणे दोन महिन्यांपासून पुकारलेले बेमुदत काम बंद आंदोलन व उपोषण अखेर शुक्रवारी मागे घेण्यात आले. राहणीमान भत्ता फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देऊन,समान वेतनाची मागणी शासन दरबारी रेटण्याचे आश्वासन कृषी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कर्मचार्यांना देण्यात आले.
खरीप हंगाम पूर्ण हातातून गेला आहे. आता रब्बी हंगामाचे दिवस आल्याने संपावर तोडगा काढण्यासाठीचे कृषी विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते.पावणे दोन महिन्यानंतर अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून,कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ६ ऑक्टोबर रोजी कर्मचार्यांनी आंदोलन व उपोषण मागे घेतले. यासाठी कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी कर्मचार्यांची बाजू समजून घेतली होती व त्यांना राहणीमान भत्त्यांची रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन दिले होते, तसेच विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी.एम.मानकर यांनीसुद्धा उपोषण मागे घेण्याकरिता कर्मचार्यांशी चर्चा केली होती. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सदर आंदोलन करण्यात आल्याने विद्यापीठाचे विविध प्रक्षेत्रावरील संशोधनात्मक कार्यावर तसेच बीजोत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. दरम्यान, कामगार संघटना प्रतिनिधी राजेश मुरुमकार, गौतम थोरात, प्रकाश सदांशिव यांनी विद्यापीठ प्रशासनास उपोषण मागे घेत असल्याचे लेखी कळवीत मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. कुलसचिवांच्याहस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू-पाणी पाजून उपोषणाची सांगता झाली. यावेळी कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी संजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके, बोदडे व इतरांनी सहकार्य केले, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते व त्यांच्या चमूने उपोषणकर्त्यांची वेळोवेळी तपासणी केली.
संपामुळे पिकांचे झाले नुकसान
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जवळपास ५ हजार एकर क्षेत्र असून, यातील साडेतीन हजार हेक्टरवर पिके घेतली जातात, शेतकर्यांना कृषी विद्यापीठाचे बियाणे उपलब्ध करू न देण्यासाठी या प्रक्षेत्रावर विविध पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते;खरीप पिकांचा हंगाम सुरू असताना कर्मचार्यांनी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन सुरू केल्याने कृषी विद्यापीठातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मूग,उडीद तसेच सोयाबीन पीक हातचे गेले असून, कापूस व तुरीचे पीकही गुरांनी फस्त करणे लावले आहे.