पंडित दीनदयाल स्वस्थ महाराष्ट्र अभियानाची आज मुहूर्तमेढ

By admin | Published: May 1, 2017 03:08 AM2017-05-01T03:08:39+5:302017-05-01T03:08:39+5:30

पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम : पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Pandit Deendayal today launched the Healthy Maharashtra campaign | पंडित दीनदयाल स्वस्थ महाराष्ट्र अभियानाची आज मुहूर्तमेढ

पंडित दीनदयाल स्वस्थ महाराष्ट्र अभियानाची आज मुहूर्तमेढ

Next

अकोला : राज्य शासनाकडून सहा जिल्ह्यांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून, यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. सोमवार, १ मे रोजी लालबहादूर शास्त्री मैदानावर होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. या अंतर्गत २ मे पासून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
गरीब, गरजू रुग्णांकरिता विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पूर्वतपासणी मोहिमेच्या निष्कर्षानुसार आरोग्य यंत्रणेस प्रशिक्षण, आजाराबाबतची जनजागृती आणि शासनाच्या अस्तित्वात असलेल्या योजनांमार्फत विनामूल्य उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अभियान राबविण्याबाबतचा सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला असून, सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येईल. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधींनी घेतला आढावा
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सोमवारपासून सुरू होणाऱ्या या अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. बैठकीला खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Pandit Deendayal today launched the Healthy Maharashtra campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.