पणज-शहापूर पाटबंधारे प्रकल्प रखडलेलाच

By admin | Published: November 7, 2014 11:11 PM2014-11-07T23:11:03+5:302014-11-07T23:11:03+5:30

आकोट तालुक्यात पणज परिसरातील प्रकल्प.

The Panj-Shahapur Irrigation Project | पणज-शहापूर पाटबंधारे प्रकल्प रखडलेलाच

पणज-शहापूर पाटबंधारे प्रकल्प रखडलेलाच

Next

पणज (आकोट, जि. अकोला): आकोट तालुक्यात पणज परिसरातील बोर्डी, चांभार व आड या नद्यांच्या तिहेरी संगमावर होत असलेल्या शहापूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम गत अनेक दिवसांपासून रखडले आहे.
पणज परिसरात २00८ पासून शहापूर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी पणज, वडाळी देशमुख, शहापूर, वाघोडा या गावांतील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. अजूनही प्रकल्पाकरिता आवश्यक असणार्‍या शेतजमिनीपैकी ३0 ते ३५ टक्के जमिनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. प्रकल्प सुरू झाला तेव्हा ज्या भावाने शेतजमिनीच्या खरेदी करून घेण्यात आल्या, त्यापेक्षा आता पाच ते सहा पटींनी वाढले आहेत. सद्य:स्थितीत बाजारभावाप्रमाणे जमिनी खरेदी करून देण्यास तयार असल्याचे पत्र शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. तथापी, या प्रकल्पासाठी जमिनी देण्यास शेतकरी तयार नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
प्रकल्पाचे रखडलेले काम लवकर सुरू व्हावे, यासाठी शेतकर्‍यांनी २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण केले होते. दिवाळीनंतर कामाला सुरुवात होईल, असे यावेळी पटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले होते. आता दिवाळीनंतर १0 ते १५ दिवस होऊन गेले तरीदेखील या शहापूर प्रकल्पाच्या कामाचा श्रीगणेशा झाला नाही. येथील बागायती शेती कोरडवाहू दर्शवून खरेदी करण्यात आली. कोरडवाहू दराने मोबदला देण्यात आला. एकरी दोन लाख ते ३ लाख ६0 हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आली. बागायती शेतीच्या दराप्रमाणे मोबदला मिळाला असता, तर दुप्पट पैसे हातात पडले असते, असा दावा शेतकर्‍यांनी केला आहे. शेतीचे मूल्यांकन २00९ मध्ये केल्यानंतर प्रत्यक्षात खरेदी मात्र २0११ मध्ये झाली. या दोन वर्षांत जमिनीचे दर वाढले; त्याचे मूल्यांकन झाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या एक वर्षापासून या प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात आहे. प्रकल्पाचे उर्वरित काम तातडीने सुरू करा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Web Title: The Panj-Shahapur Irrigation Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.