आगीखेडच्या गायरानावर बहरले ४०० झाडांचे ‘नंदनवन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:39+5:302021-06-20T04:14:39+5:30
संतोषकुमार गवई पातूर : परिश्रम, इच्छाशक्ती व नियोजनाच्या जोरावर तालुक्यातील आगीखेड येथील गायरानावर ४०० वृक्षांचे नंदनवन फुलले आहे. यासाठी ...
संतोषकुमार गवई
पातूर : परिश्रम, इच्छाशक्ती व नियोजनाच्या जोरावर तालुक्यातील आगीखेड येथील गायरानावर ४०० वृक्षांचे नंदनवन फुलले आहे. यासाठी सतत तीन वर्षे सामाजिक वनीकरण, आगीखेडवासीयांचे परिश्रम व पातूरचे तत्कालीन तहसीलदार तथा विद्यमान बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्या पुढाकाराने ही किमया साधली आहे.
पातूरचे तत्कालीन तहसीलदार आणि विद्यमान बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत आगीखेड आणि सामाजिक वनीकरण यांच्या सहकार्याने दि. १५ ऑगस्ट २०१८ रोजी आगीखेड येथील पाच हेक्टरवरील ई-क्लास गायरान जमिनीवर जांभळाची १०० झाडे, कडूनिंब १०० झाडे, आंब्याची १०० झाडे आणि कैशियाची १०० झाडे, अशा एकूण ४०० झाडांची लागवड केली. या वृक्षांचे सतत तीन वर्षे ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण विभागाने संगोपन करीत रक्षण केले. सद्य:स्थितीत हे वृक्ष मोठे झाले असून, या गायरान जमिनीवर नंदनवन फुलले आहे. (फोटो)
--------------------
२०० वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प
बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी शनिवारी आगीखेड येथील माळरानावर बहरलेल्या नंदनवनाला भेट दिली. दरम्यान, या गायरान जमिनीवर आणखी २०० वृक्षांची नव्याने लागवड करण्याचे नियोजन केल्याचे सरपंच पूनम विवेक उगले यांनी सांगितले.
---------------------
आगीखेड येथील माळरानावर ४०० झाडे ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने बहरली आहेत. याचा मला अतिशय आनंद आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण काळाची गरज बनले आहे.
-डॉ. रामेश्वर पुरी, उपविभागीय अधिकारी, बाळापूर.
-----------------
ग्रामपंचायतीच्या परिश्रमाने गायरान जमिनीवर ४०० झाडे डोलू लागली आहेत. या झाडांपैकी १०० झाडे आंब्याची व १०० झाडे जांभळाची असल्याने पुढील काळात ग्रा.पं.च्या उत्पादनात नक्कीच भर पडणार आहे. आणखी २०० झाडांची लागवड करण्याचे नियोजन आहे.
-पूनम विवेक उगले, सरपंच, आगीखेड.
------------------------
आगीखेड येथे गायरान क्षेत्रावर ४०० झाडांची लागवड केली. सद्य:स्थितीत ती झाडे जगली असून, फुलली आहेत.
-एम. पी. नाईक, तलाठी, आगीखेड.