परमहंस रामचंद्र महाराज समाधिस्त; साश्रूनयनांनी भक्तांनी दिला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 21:15 IST2021-05-17T21:14:54+5:302021-05-17T21:15:00+5:30
Paramahansa Ramachandra Maharaj : परमहंस रामचंद्र महाराज (७४) यांनी सोमवारी श्रीक्षेत्र वझेगाव येथे अखेरचा श्वास घेतला.

परमहंस रामचंद्र महाराज समाधिस्त; साश्रूनयनांनी भक्तांनी दिला निरोप
निंबा फाटा : विदर्भातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमहंस रामचंद्र महाराज (७४) यांनी सोमवारी श्रीक्षेत्र वझेगाव येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या समाधी सोहळ्याची माहिती होताच, हजारो भाविकांनी संचारबंदी झुगारून श्रीक्षेत्र वझेगाव येथे गर्दी केली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत परमहंस रामचंद्र महाराजांना समाधी देण्यात आली. हजारो भाविकांनी साश्रूनयनांनी त्यांना निरोप दिला.
वझेगाव येथे १७ एप्रिल १९४८ ला रामनवमीच्या दिवशी परमहंस रामचंद्र महाराजांचा जन्म झाला. त्यांचा समाधी सोहळा याचि देही.. याचि डोळा.. अनुभवण्याकरिता शेकडो भक्तांनी कोरोना स्थितीतही वझेगाव येथे हजेरी लावली. तीर्थक्षेत्र वझेगाव येथील मंदिर परिसरात परमहंस रामचंद्रबाबांना समाधी देण्यात आली.
वझेगावची भूमी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली. महाराजांचे पूर्ण नाव रामचंद्र ओंकारराव घुले असे आहे. बालपणी लत्या नावाने ओळख असलेल्या महाराजांनी बालवयातच अनंत लीला केल्या. १७ ऑगस्ट १९५९ ला त्यांनी मनकर्णा नदीच्या महापुरात उडी घेतली. भक्तांना दृष्टांत दिले. बालब्रह्मचारी महाराज दिगंबर अवस्थेत राहत होते. दर सोमवारी वझेगावला दर्शनाकरिता भक्तांची मांदियाळी असायची.
तीर्थस्थळाचा ब दर्जा प्राप्त
परमहंस रामचंद्र संस्थानच्या वतीने रामनवमी ते हनुमान जयंती या सप्ताहात भव्य यात्रा भरायची. बाबांवर अतूट श्रध्दा असणाऱ्या हजारो भक्तांनी बाबांच्या सांकेतिक शब्दांची अनुभूती घेतली आहे. रामचंद्र महाराज की जय असा जयघोष करीत पुष्पवृष्टी करीत टाळ-मृदंगाच्या गजरात सजलेल्या रथातून महाराजांना समाधिस्थळी आणण्यात आले. मंदिर परिसरातच संस्थानचे अध्यक्ष भगवान घुले व शेकडो भक्तांच्या साक्षीने विधिवत रामचंद्र महाराजांना समाधी देण्यात आली. या ठिकाणी संस्थानच्या वतीने भव्य समाधी मंदिर बांधणार असल्याचे अध्यक्ष घुले यांनी सांगितले.
पायी, मिळेल त्या वाहनाने भाविक वझेगावात
परमहंस रामचंद्र महाराजांचे अखेरचे दर्शन घेण्याकरिता भक्तांनी गर्दी केली होती. पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांकडून भाविकांना अटकाव करण्यात येत असतानाही, भाविकांनी पायी, मिळेल त्या वाहनाने वझेगावला येत, रामचंद्र महाराजांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांना साश्रूनयनांनी निरोप दिला.