१२ वीच्या उत्तरपत्रिकेचे पार्सल बेवारस आढळले
By admin | Published: March 11, 2015 01:38 AM2015-03-11T01:38:44+5:302015-03-11T01:38:44+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील घटना, पार्सल डाक विभागाच्या ताब्यात
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाट्याजवळ १२ वीच्या उत्तरपत्रिकेचे पार्सल १0 मार्च रोजी बेवारस अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. काही युवकांनी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये हे पार्सल जमा केल्यानंतर डाक विभागाने ते ताब्यात घेतले.
१0 व १२ वीच्या परिक्षा सर्वत्र सुरू असतानाच, मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाट्याजवळ मलकापूर येथील संतोष रमेश पानसरे व विजय प्रल्हाद डोळसे यांना उत्तरपत्रिकेचे सीलबंद पार्सल आढळले. या पार्सलवर प्रेषक म्हणून अमरावती, परिक्षा मंडळ, अमरावती लिहिलेले असून प्रति म्हणून मनुबाई गुजराथी ज्युनिअर कॉलेज, अमरावती असे लिहिले आहे. या पार्सलची एक बाजू थोडी फाटली असून, त्यात १२ वीच्या उत्तरपत्रिका असल्याचे दिसून आले. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता या युवकांनी बुलडाणा पोलिस स्टेशनमध्ये पार्सल जमा केले. हे पार्सल डाक विभागाने संध्याकाळी ताब्यात घेतले. उत्तरपत्रिकेच्या पार्सलची एसटीतून वाहतूक सुरू असताना, वाघजाळ फाट्याजवळ ते पडल्याची चर्चा आहे. उत्तरपत्रिकेची वाहतूक करताना शिक्षण विभाग योग्य ती काळजी घेत नसून, यानिमित्ताने शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.