पालकांनो पाल्यांकडे वेळीच लक्ष द्या, अन्यथा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:15 AM2021-06-25T04:15:12+5:302021-06-25T04:15:12+5:30
शहरासह ग्रामीण भागात मुली पळून जाण्याच्या घडत असलेल्या घटना व महिलांबाबतीत होत असलेल्या विनयभंगाचे दाखल होत असलेले गुन्हे पाहता, ...
शहरासह ग्रामीण भागात मुली पळून जाण्याच्या घडत असलेल्या घटना व महिलांबाबतीत होत असलेल्या विनयभंगाचे दाखल होत असलेले गुन्हे पाहता, पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. अन्यथा अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुली पळून जाण्याच्या घटना घडत आहेत. मुलगी पळवून नेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारींचे वाढत असलेले प्रमाण पालकांसाठी चिंताजनक आहे. यातील अनेक प्रकरणे बदनामीच्या भीतीमुळे पोलीस स्टेशनपर्यंत येत नाहीत. दोन दिवसआड कुठे ना कुठे मुलगी पळून गेली किंवा पळवून नेल्याची तक्रार येते. पळून जाणाऱ्या युवक व युवतीचे वय १८ किंवा त्यावरील आहे. आयुष्य काय आहे, कसे जगायचे आहे किंवा त्यातील चढ-उतार काय असतात, भविष्यात याचे होणारे परिणाम याची पुसटशीही कल्पना त्यांना नसते. ही मुले सरळ विवाह करून परतात. यावेळी त्या पालकांची काय अवस्था होत असेल? केवळ क्षणिक सुखाच्या प्रेमापोटी हे सर्व घडत आहे. काही दिवसांत तर दोन-चार दिवसआड मुलगी गेल्याच्या घटना घडत आहेत.
विनयभंगाच्या वाढत्या घटनाही चिंताजनक
महिलांसोबत होत असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखले पाहिजे. घडणाऱ्या घटना चिंताजनक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना किती मोकळे सोडावे व कितपत स्वातंत्र द्यावे, याचा विचार पालकांनी करण्याची गरज आहे.
मनब्दा येथील घरातून पसार
तालुक्यातील मनब्दा येथील १८ वर्षीय युवती घरातील ५० हजार रुपये, दुचाकी आणि सोन्याची चेन घेऊन घरातून पसार झाली. तिने घरात कोणालाही काहीही न कळवता, पोबारा केला. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.