वैद्यकीय प्रवेश घेताना पालक, विद्यार्थ्यांनी खबरदारी घ्यावी!
By Admin | Published: June 5, 2017 02:05 AM2017-06-05T02:05:32+5:302017-06-05T02:05:32+5:30
प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिर: प्रवीण शिनगारे यांचे मार्गदर्शन, विद्यार्थी पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नीट परीक्षेचा निकाल लवकरच लागणार आहे. नीट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश घेण्यापूर्वी प्रवेश अर्ज काळजीपूर्वक भरावे लागणार आहेत. कॉलेज कोड टाकताना १ ते ९ पर्यंंतचे डिजिट विचारपूर्वक आणि लक्षपूर्वक भरावे. डिजिटमधील एकही आकडा चुकला तर एमबीबीएस प्रवेशापासून तुम्ही मुकला. मेहनत करूनही तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अत्यंत दक्ष राहून स्वत:च्या आत्मविश्वासाच्या भरवशावर न राहता घरातील चार व्यक्तींना तरी भरलेला अर्ज दाखवावा, अशा शब्दांत राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी येथे मार्गदर्शन केले.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी प्रमिलाताई ओक सभागृहात नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरात ते बोलत होते. विद्यार्थी व पालकांनी वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ. अपर्णा पाटील, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन केले. डॉ. शिनगारे यांनी राज्यातील १ लाख ३९ हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली असून, राज्यात ७५00 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे, असे सांगत शिनगारे म्हणाले, की राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उत्कृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी सर्वच महाविद्यालयांना पसंती द्यावी; परंतु प्रवेश अर्ज भरताना एकदाच पक्का निर्णय घ्या, अर्ज भरताना खाडाखोड करू नका, पर्याय निवडताना अनेकजण जवळचे वैद्यकीय महाविद्यालय निवडतात; परंतु पालक व विद्यार्थ्यांंंनी प्रथम मुंबई, नागपूरचा विचार करावा. अर्ज भरताना सामूहिक निर्णय घ्या, कॉलेज कोडचे फोर डिजिट, कॉलेजला प्राधान्य देताना अर्ज लक्षपूर्वक भरा, डिजिटमधील एकही आकडा चुकला तर एमबीबीएस प्रवेशापासून तुम्ही मुकले असे समजा, असा सल्लाही डॉ. शिनगारे यांनी दिला.
वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा, शुल्क याची माहिती घ्या. प्रवेश कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात मिळतो आहे, याला महत्त्व न देता प्रवेशाला महत्त्व द्यावे. माझ्या मते, ज्या कॉलेजमध्ये पदव्युत्तर जागा जास्त आहेत, ते कॉलेज चांगले, अशा शब्दांत शिनगारे यांनी मार्गदर्शन केले.