थेट रस्त्यावर ‘पार्किंग’; मनपाचा उफराटा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 01:33 PM2020-03-06T13:33:49+5:302020-03-06T13:33:58+5:30

कवच आर्केड कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूच्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर वाहनतळाची जागा निश्चित करण्यात आली आहे.

'Parking' on direct street; Municipal Corporation work | थेट रस्त्यावर ‘पार्किंग’; मनपाचा उफराटा कारभार

थेट रस्त्यावर ‘पार्किंग’; मनपाचा उफराटा कारभार

Next

अकोला: शहरात विविध कामकाजानिमित्त दाखल होणाऱ्या नागरिकांची चारचाकी, दुचाकी वाहने ठेवण्यासाठी मनपाने पार्किंगची सोय उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. वाहनतळ नेमक्या कोणत्या ठिकाणी निश्चित करावे, याचे भान प्रशासनाला नसल्याचे समोर आले असून, चक्क रस्त्यावर पार्किंगसाठी जागा राखीव ठेवण्याचा प्रताप मनपाच्या नगररचना, बाजार व परवाना तसेच ‘एनयूएलएम’ विभागाने केला आहे. गांधी रोडवरील कवच आर्केड कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूच्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर वाहनतळाची जागा निश्चित करण्यात आली आहे.
शहराच्या विविध भागात महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आहेत. यापैकी मुख्य बाजारपेठ व इतर भागातील वाहनांसाठी प्रशासनाने चार वर्षांपूर्वी २२ जागा निश्चित केल्या होत्या. सदर जागा भाडेपट्ट्यावर देण्यासाठी मनपा प्रशासनाने खासगी कंत्राटदारांसोबत करारनामा केले. कंत्राटदारांनी २२ पैकी केवळ १२ जागा निश्चित करून त्याबदल्यात मनपाकडे पैसे जमा केले. सदर जागा वाहनधारकांच्या वाहनांसाठी उपलब्ध असणे भाग होते. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार घडत आहे. वाहनधारकांच्या कटकटीपेक्षा लघू व्यावसायिक, फेरीवाले, हातगाडी चालक, फळ विके्रत्यांना जागा दिल्यास त्यांच्याकडून जादा रक्कम वसूल करण्याचा फंडा कंत्राटदारांनी शोधून काढला. हाच कित्ता शहरात सर्वत्र राबविल्या जात आहे. वाहनधारकांसाठी जागा नसल्यामुळे ते नाइलाजाने रस्त्यांवर वाहने उभी करतात. यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असल्याचे चित्र आहे.

रस्त्यावर पार्किंग कशी?
मनपाच्या नगररचना विभाग, बाजार व परवाना विभाग तसेच ‘एनयूएलएम’ विभागाने पार्किंगच्या जागेसाठी शहरात सर्व्हे केला. दहा ठिकाणी जागा निश्चित करण्यात येऊन त्यामध्ये कवच आर्केडमागील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर वाहनतळाला मंजुरी देण्याचा उफराटा कारभार केला. रस्त्यावर पार्किंगचे स्थळ कसे, असा सवाल सुज्ञ अकोलेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

गटनेत्यांचा घसा कोरडा, पण...
कवच आर्केड कॉम्प्लेक्सच्या मागील परिसरात लहान मुलांसाठी अनेक हॉस्पिटल आहेत. हा परिसर चौपाटी म्हणून शहरात प्रसिद्ध असून, या ठिकाणी बाराही महिने नागरिकांची गर्दी दिसून येते. अशावेळी रस्त्यावर पार्किंग निश्चित केल्यास व भविष्यात दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करीत भाजपचे गटनेता तथा स्थायी समिती सदस्य राहुल देशमुख यांनी ही जागा रद्द करण्याची मागणी स्थायी समितीमध्ये लावून धरली होती. देशमुख यांचा घसा कोरडा झाला; पण सभागृहाने जागा रद्द केली नाही, हे विशेष.

 

 

 

Web Title: 'Parking' on direct street; Municipal Corporation work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.