एसटीची पार्किंग बनली महामंडळाची डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:32+5:302021-09-17T04:23:32+5:30

अकोला : शहरातील आगार क्रमांक २ येथील बसस्थानकातील दुचाकी पार्किंग दीड वर्षापासून बंद आहे. या पार्किंगकरिता एसटी महामंडळाने निविदा ...

Parking of ST became a headache for the corporation! | एसटीची पार्किंग बनली महामंडळाची डोकेदुखी!

एसटीची पार्किंग बनली महामंडळाची डोकेदुखी!

Next

अकोला : शहरातील आगार क्रमांक २ येथील बसस्थानकातील दुचाकी पार्किंग दीड वर्षापासून बंद आहे. या पार्किंगकरिता एसटी महामंडळाने निविदा प्रसिद्ध केली होती; परंतु प्रतिसाद न मिळाल्याने दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली. तरी एकही निविदा आली नसल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही पार्किंग एसटी महामंडळासाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. कोरोना विषाणूमुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणी सापडले आहे. वारंवार लॉकडाऊन व निर्बंध लागत असल्याने प्रवासी बसही बंद ठेवण्याची वेळ येत आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. दरम्यान, शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील पार्किंग, कॅन्टीन व इतर साहित्य विक्री दुकानांच्या माध्यमातून महामंडळाला काही प्रमाणात आर्थिक लाभ होतो. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून येथील पार्किंग बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना स्थानकात दुचाकी उभी करण्यासाठी अडचणी येत आहेत. या पार्किंगकरिता एसटी महामंडळाने निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने प्रथम मुदतवाढ दिली. मात्र, एकही निविदा प्राप्त झाली नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. या निविदेचीही मुदत संपली असून, प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळाच्या अडचणी वाढत आहेत.

निविदा प्रसिद्ध १३ मार्च २०२१

प्रथम मुदतवाढ १७ मे २०२१

दुसऱ्यांदा मुदतवाढ ८ जून २०२१

२०२२ मध्ये पुन्हा निघणार निविदा

यावर्षी निविदा प्रसिद्ध करून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. तरीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे २०२२ मध्ये पार्किंगसाठी पुन्हा नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही निविदा १० टक्क्यांनी करून प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

प्रवासी म्हणतात...

मूर्तिजापूर येथे ड्यूटी असल्याने एसटी महामंडळाच्या बसने दररोज ये-जा करतो. आधीपासून घरापासून दुचाकीने बसस्थानकापर्यंत येत असल्याने बसस्थानकातील पार्किंगमध्ये दुचाकी उभी करीत असतो; परंतु पार्किंग बंद असल्याने स्थानकात कुठेही दुचाकी उभी करून द्यावी लागत आहे.

- सचिन देशमुख

बहुतांश वेळा एसटी बसने नातेवाईक भेटीसाठी येत असतात. हे नातेवाईक गावाकडे परत जाताना दुचाकीने बसस्थानकापर्यंत सोडून देतो; परंतु काही महिन्यांपासून येथील पार्किंग बंद असल्याने बसस्थानकातील भिंतीलगत दुचाकी उभी करावी लागत आहे.

- जयेश इंगळे

अडचणी थांबता थांबेना!

कोरोना काळात एसटी महामंडळाच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही. आधीच प्रवासी नसल्याने फेऱ्यांची संख्या कमी आहे. काही बस आगारातच उभ्या आहे. यात पार्किंग बंद असल्याने या माध्यमातून मिळणारी आर्थिक आवक बंद आहे.

Web Title: Parking of ST became a headache for the corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.