कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत सहभाग; २५ जणांवर गुन्हे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:04 AM2020-05-19T10:04:44+5:302020-05-19T10:05:16+5:30
अंत्ययात्रेत सहभागी होऊन जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील २५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा १३ मे रोजी मृत्यू झाला होता. संचारबंदी व जमावबंदी असतानाही त्यांच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक उपस्थित होते. या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अंत्ययात्रेत सहभागी होऊन जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील २५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील एका व्यक्तीचा १३ मे रोजी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सर्वोपचार रुग्णालयामध्ये त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. तसेच या व्यक्तीच्या पार्थिवावर १४ मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यामुळे संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशाची पायमल्ली तसेच कलम १४४ चा भंग केल्याप्रकरणी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या फोरोज खा इनायत खा, सैयद नौशाद सय्यद नासीर, अब्दुल तोहीद, अजुमोद्दीन कुतुबोद्दीन, अहमद अयूब अहमद नासीर, नासिरोद्दीन जमिरोद्दीन, गुलाम हबीब गुलाम मुस्तफा, वसिमोद्दीन निराजोद्दीन व अब्दुल मतीन अब्दुल जब्बार यांच्यासह २५ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी असताना फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, कोणतीही काळजी न घेणे, जमाव करणे व नियमांचा भंग करून कलम १४४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल आसीफ अली यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम १८८ व २६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट
मूर्तिजापूर शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने संपूर्ण तालुका ढवळून निघाला आहे. याच पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी हेंडज तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अलगीकरण कक्ष व लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली केली व समस्या जाणून घेतल्या.