नव्या शैक्षणिक धाेरणाच्या प्रक्रियेत धाेत्रेंचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:14 AM2021-07-08T04:14:02+5:302021-07-08T04:14:02+5:30
अकाेला : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात बुधवारी केलेल्या फेरबदलात केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी पक्षादेश व प्रकृती ...
अकाेला : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात बुधवारी केलेल्या फेरबदलात केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी पक्षादेश व प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील अकाेल्याचे स्थान संपुष्टात आले आहे. ना. धाेत्रे यांना अवघा दाेन वर्षांचा कार्यकाळ मिळाला असला तरी या कार्यकाळात देशातील नव्या शैक्षणिक धाेरणाची घाेषणा झाली. हे धाेरण ठरविण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग हा त्यांच्या कारकिर्दीत उल्लेखनीय ठरला आहे.
अकाेला लाेकसभा मतदारसंघातून सलग चाैथ्यांदा विजय मिळविणाऱ्या ना. धाेत्रे यांनी अकाेला जिल्हा भाजपमय केला आहे. सेनेसाेबत युती असताना गेल्या विधानसभेतही शत-प्रतिशत युतीच्या विजयाचे ते शिल्पकार ठरले, त्यामुळेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व केंद्रीय मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान अशा पाॅवरफुल खात्यांचे राज्यमंत्री पद साेपविण्यात आले हाेते. त्यांच्या कार्यकाळात नव्या शैक्षणिक धाेरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली या धाेरणासंदर्भातील अधिकृत घाेषणा केंद्रीय मंत्री पाेखरियाल यांनी दिल्ली तर संजय धाेत्रे यांनी अकाेल्यातील पत्रपरिषदेत केली हाेती. १९६८ मध्ये देशाचे पहिले शैक्षणिक धोरण इंदिरा गांधी सरकारमध्ये मांडण्यात आले, त्यानंतर ३१ वर्षांनंतर नवे शैक्षणिक धाेरण जाहीर झाले हाेते. विशेष म्हणजे याच दिवसापासून मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले, त्यामुळे ते पहिले केंद्रीय शिक्षण राज्यमंत्रीही झाले. त्यांचा बहुतांश कार्यकाळ हा काेराेना संकटातच गेला, मात्र अकाेल्यातील अनेक विकास याेजनांना मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले.
बाॅक्स...
मंगळवारी भूषविले ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद
ब्रिक्स देशांमध्ये उच्च शिक्षण आणि तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (टीव्हीईटी) क्षेत्रात शैक्षणिक व संशोधन सहकार्य अधिक बळकट करण्याच्या संकल्पासह संयुक्त घोषणापत्रावर ब्रिक्स देशांच्या शिक्षणमंत्र्यांनी आभासी स्वाक्षऱ्या केल्या. १३ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे हाेते व त्याचे अध्यक्षस्थान संजय धाेत्रे यांनी भूषविले हाेते.