अमित शाह यांचा दौरा: पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड
By आशीष गावंडे | Published: March 5, 2024 12:49 PM2024-03-05T12:49:44+5:302024-03-05T12:50:40+5:30
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पृष्ठभूमीवर पोलिसांची खबरदारी
अकोला: केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेता अमित शाह अकोल्यात दाखल होणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून अकोला पोलिसांकडून शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांची सकाळपासूनच धरपकड केली जात आहे.
आगामी एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. पश्चिम विदर्भातील पाच तसेच पूर्व विदर्भातील एक अशा एकूण सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी दस्तूरखुद्द केंद्रीय मंत्री अमित शाह मंगळवारी शहरात दाखल होत आहेत. त्या पृष्ठभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी कडेकोट फौजफाटा तैनात केला असून जागोजागी चोख सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांचे अकोल्यात आगमन होणार असल्यामुळे शिवसेनेचे (ठाकरे गट) शहर प्रमुख राजेश मिश्रा व इतर पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन केले जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना लागताच पोलिसांनी अलर्ट होत सेनेच्या पदाधिकाऱ्यांची धर पकड सुरू केली आहे. यावर आम्ही शहराची पाणीपुरवठा योजना व इतर मुद्द्यांवर गृहमंत्र्यांना निवेदन देणार होतो. अमित शाह कोण्या एका पक्षाचे नव्हे तर ते संपूर्ण देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना निवेदन देणे आमचा नैतिक अधिकार असल्याची प्रतिक्रिया सेनेचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी लोकमतशी बोलताना दिली.