पाशा पटेल यांनी घेतला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आढावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:59 PM2019-01-08T14:59:50+5:302019-01-08T15:00:29+5:30
अकोला: महाराष्ट्र राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (राज्यमंत्री दर्जा) यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी मूल्य योजना, कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग येथे राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येणारी पीक उत्पादन खर्च काढण्याची योजनेसंदर्भात आढावा बैठक घेतली.
अकोला: महाराष्ट्र राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (राज्यमंत्री दर्जा) यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी मूल्य योजना, कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग येथे राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येणारी पीक उत्पादन खर्च काढण्याची योजनेसंदर्भात आढावा बैठक घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री कापूस सल्लागार समिती अंतर्गत महाराष्ट्रातील कापूस पिकाच्या समस्या, अडचणी, बाजारभाव व उद्योगातील संधी तथा इतर अनुषंगिक बाबतीत उपाययोजना जाणून घेतल्या. या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या आढावा सभेला कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाचे प्रमुख डॉ. बी.एन. गणवीर, कृषी मूल्य योजनेचे क्षेत्र अधिकारी डॉ.ए.ए. भोपाळे, टेक्स्टाइल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोनोरे, सीसीआयचे उपाध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल, कापूस उत्पादक कंपनी अध्यक्ष निलावार यांच्यासह राज्यातील प्रगतिशील शेतकरी व इतर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी शेतकरी व व्यापारी वर्गाने एकत्रित प्रयत्नांनी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे अधिक विस्तृत करीत एक गाव एक पीक पद्धती सोबतच एक वाण पुरस्कार करावा आणि शेतीला अधिक आर्थिक फायदेशीर बनवावे, असे आवाहनसुद्धा पटेल यांनी यावेळी केले. तर गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लोकसहभाग, सलग्न शासकीय विभाग, विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून केलेले प्रयत्न व उद्दिष्टपूर्ती अधोरेखित करीत कृषी विद्यापीठ आणि इतर विभागांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज लक्षात घेऊन भविष्यात नियोजन केले असल्याचे आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले. याप्रसंगी उपस्थितांनी पटेल यांच्यासमोर आपले विचार मांडले व कापूस पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याचे आश्वस्त केले.
याप्रसंगी पाशा पटेल यांनी विद्यापीठातील उद्यानविद्या विभाग, सेंद्रिय शेती प्रक्षेत्र, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विभागाला सदिच्छा भेटी दिल्या व संशोधनाचा, उपलब्धींचा आढावा घेतला, याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्यासह विद्यापीठीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.