अनुत्तीर्ण ठरलेला विद्यार्थी झाला उत्तीर्ण
By Admin | Published: June 29, 2014 11:19 PM2014-06-29T23:19:17+5:302014-06-30T01:52:03+5:30
लोणार येथील उत्तरपत्रिका फेरतपासणीत १९ चे झाले ६४ !
लोणार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत लोणार येथील महाराणा प्रताप कला व कनिष्ठ महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांला समाजशास्त्र विषयात १९ गुण मिळून, तो अनुत्तीर्ण झाला होता. या विद्यार्थ्याने शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे उत्तरपत्रिकेची फेरतपासणी करण्याची मागणी केली असता, त्याला या विषयात ६४ गुण असल्याचे आढळून आल्याने तो उत्तीर्ण झाला.
राजस्थानी समाजसेवा मंडळाद्वारा संचालीत महाराणा प्रताप कला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीमध्ये कला शाखेत शिक्षण घेणार्या तालुक्या तील नांद्रा येथील विजय नरवाडे या विद्यार्थ्याने फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेली बारावीची परीक्षा दिली. २ जून रोजी लागलेल्या ऑनलाईन निकालात या विद्यार्थ्यास समाजशास्त्र या विषयामध्ये प्रात्यक्षिकाचे १९ गुण असल्याचे दर्शवून त्यास अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले होते. १0 जून रोजी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या. त्यामध्येही समाजशास्त्र विषयात तो अनुत्तीर्ण असल्याचे दाखविण्यात आले. विजय नरवाडेला आपण ७0 गुणांचा पेपर सोडविल्याची खात्री असल्याने, त्याने अमरावती विभागाकडे फेरतपासणी करण्यासाठी उत्तरपत्रिकेच्या प्रतिची मागणी केली. उत्तरपत्रिकेत त्याला ६४ गुण असल्याचे आढळून आले. चूक लक्षात आल्याने अमरावती बोर्डाने या विद्यार्थ्यास प्रात्यक्षिकाचे १९ आणि उत्तरपत्रिकेतील ६४ अशा एकूण ८३ गुणांची सुधारित गुणपत्रिका देऊन त्याला उत्तीर्ण घोषित केले. डाटा ऑपरेटरच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यास नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला.