पॅसेंजर होणार एक्स्प्रेसमध्ये परावर्तित; जिल्ह्यातून जाणाऱ्या पाच गाड्यांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:21 AM2021-08-26T04:21:36+5:302021-08-26T04:21:36+5:30
अकोला : रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली तरी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या ...
अकोला : रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली तरी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या नाहीत. विशेष गाड्यांच्या जादा भाड्याने सामान्य प्रवासी मेटाकुटीला आलेला असतानाच आता २०० किमीपेक्षा अधिक अंतर कापणाऱ्या व तोट्यात असलेल्या पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असल्याची माहिती आहे. पॅसेंजर गाड्या कायमच्या बंद झाल्या तर सामान्य प्रवाशांनी प्रवास करावा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर
मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेचे जंक्शन स्टेशन असलेल्या अकोला येथून पाच पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. कोरोना काळात या पॅसेंजर गाड्या बंद झाल्यापासून नजीकचा प्रवास करणाऱ्यांची गाेची होत आहे. जवळच्या स्थानकासाठीही महागडे तिकीट ते देखील ऑनलाइन आरक्षण करून काढावे लागते. पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित झाल्या तर सामान्य प्रवाशांना रेल्वेची दारेच बंद होतील, अशी भावना जनसामान्यात आहे.
जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या
गाडी क्रमांक गाडी नाव सध्या सुरू की बंद
५११८३ भुसावळ-नरखेड बंद ५११९८ वर्धा-भुसावळ बंद
५१२८६ नागपूर-भुसावळ बंद
५७५८१ अकोला-पूर्णा बंद
५७५३९ अकोला-परळी बंद
पॅसेंजर गाड्यांचे भवितव्य अनिश्चित
कोरोना काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या सुरू झालेल्या नसून, त्या कधी सुरू होतील याबाबत रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्यांनाही माहिती नाही. राज्य सरकार निर्णय घेईल तेव्हाच पॅसेंजर गाड्या सुरू होऊ शकतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित होण्याबाबतचा निर्णय जुना असला तरी पॅसेंजर गाड्याच सुरू नसल्यामुळे याबाबत सांगता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वसामान्यांना एक्स्प्रेस कशी परवडणार?
पॅसेंजर गाड्यांचे तिकीट कमी असते व त्या जवळपास सर्वच स्थानकांवर थांबतात, त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी त्या सोयीस्कर आहेत. दोन वर्षांपासून बंद असलेल्या या गाड्या आता एक्स्प्रेसमध्ये परावर्तित झाल्या तर सामान्यांनी कसा प्रवास करावा, हा प्रश्नच आहे.
- नारायणराव गोतमारे, एक प्रवासी
विशेष गाड्यांचे तिकीट महाग आहे व त्या जवळच्या स्थानकांवर थांबतही नाहीत. अशा परिस्थितीत पॅसेंजर गाड्या सुरू होणे गरजेचे आहे. सरकारने सामान्यांसाठी असलेल्या पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करू नये, अशी अपेक्षा आहे.
- रमेश बारस्कार, एक प्रवासी