मुंबईकडे जाणाऱ्या चार रेल्वेंचे आरक्षण मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 10:57 AM2021-06-14T10:57:06+5:302021-06-14T10:59:08+5:30
Akola Railway Station : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने रेल्वेंना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
अकोला : राज्यात अनेक जिल्हे अनलॉक झाले असून आता रेल्वेची वाहतूक बऱ्यापैकी सुरू झाली आहे; परंतु अद्यापही रेल्वेची संख्या कमी असल्याने प्रवाशांना आरक्षण मिळण्यास अडचण येत आहे. मुंबईला जाण्याकडे प्रवाशांचा सर्वाधिक कल असून, महत्त्वाच्या चार रेल्वेंचे आरक्षण फुल्ल झाले आहे. कोरोनामुळे रेल्वेच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवासी नसल्याने मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता हळूहळू निर्बंध शिथिल होत असल्याने प्रवासी संख्याही वाढली आहे. मोठ्या शहरातील उद्योग, व्यवसाय पूर्ववत होत आहेत. त्यामुळे गावाकडे परतलेले मजूर पुन्हा शहराकडे जात आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या सायंकाळी ६.२० ला सुटणाऱ्या हावडा-मुंबई, गोंदिया-मुंबई, सायंकाळी ५.३५ ला सुटणारी हावडा-मुंबई, सकाळी ११.३५ ला सुटणारी हावडा-मुंबई या रेल्वेंचे आरक्षण फुल्ल होत आहे.
एसीचेही वेटिंग
प्रवाशांकडून सामान्य बोगीसोबत एसी बोगीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसी बोगीचे आरक्षणही मिळत नसल्याचे प्रवासी सांगत आहेत. काही मार्गांवर प्रतिसाद कमी आहे.
पॅसेंजर कधी सुरू होणार?
गेल्या दीड वर्षापासून पॅसेंजर गाड्या बंद आहेत. कोरोनाकाळात होणारी गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने रेल्वेंना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे लांब पल्ल्यांच्या रेल्वेंचे आरक्षण वाढले आहे. मुंबई मार्गावर जास्त प्रमाणात आरक्षण होत आहे.
मात्र, पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रवाशांना पॅसेंजरची प्रतीक्षा लागली आहे.
सर्वाधिक वेटिंग हावडा-मुंबईला
अकोला रेल्वेस्थानकावरून मुंबई येथे जाण्यासाठी हावडा येथून तीन गाड्या सुटत आहेत. यामध्ये काही स्पेशल ट्रेनसुद्धा आहेत. या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वेटिंग दिसून येत आहे. काही प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळत आहे.
हैद्राबाद मार्गावर प्रवासी मिळेना!
मुंबई मार्गावर रेल्वे आरक्षण फुल्ल होते; परंतु हैद्राबाद मार्गावर रेल्वेला प्रवासी मिळत नाहीत. सद्य:स्थितीत या मार्गावर तीन रेल्वे सुरू आहेत. यामध्ये एका रेल्वेचे आरक्षण काही प्रमाणात होत आहे.
आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख रेल्वे
महाराष्ट्र एक्स्प्रेस
नरखेड एक्स्प्रेस
विदर्भ एक्स्प्रेस
हावडा-मुंबई एक्स्प्रेस
गितांजली एक्स्प्रेस
आझाद हिंद एक्स्प्रेस
अहमदाबाद एक्स्प्रेस
समरसता एक्स्प्रेस