धोंडी नामशेष होण्याच्या मार्गावर
By admin | Published: July 2, 2014 08:03 PM2014-07-02T20:03:00+5:302014-07-03T20:32:55+5:30
धांेडी धोंडी पाणी दे.. ही प्रथाच आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सत्य समोर येत आहे.
अनिल दबडघाव * पाथर्डी : धांेडी धोंडी पाणी दे.. हलकी हलकी ज्वारी दे... असा सूर कानावर पडण्यासाठी गावकरी आतूर व्हायचे; परंतु ही प्रथाच आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सत्य समोर येत आहे. पावसाचे भाकीत करणारी यंत्रणा व हवामान खात्याचे पावसाचे अंदाज वर्तविणारी यंत्रणा सक्रिय असल्याने ग्रामीण भागातील ही धोंडी परंपरा संपली आहे. कधीकाळी गावात पावसाकरिता धोंडी काढली जायची. लाकडी काठीला कडूनिंबाचा पाला बांधून लहान मुले काठी आपल्या हातात धरायचे. त्याच्या मधोमध बेडकाचे पिल्लू बांधलेले व पुढे कुणीतरी डफडे वाजवत अनेक आबालवृद्ध शेतकर्यांसमवेत धोडींची गाणी गात वरुणराजाला प्रसन्न करीत. या धोंडीप्रमाणेच गावात कुणी कुठेतरी पानराजा बसवायचे. ज्याला काही शेतकरी पानदेव असेसुद्धा मानत. खोल खड्डा करून त्यात मोठा दगड ठेवल्या जायचा. त्याच्या सभोवताल पाणी टाकल्या जाई. त्यावर हळद, कुंकू टाकून त्याची पूजा-अर्चा करण्यात येत असे. तसेच त्या ठिकाणी रात्रभर वरुणराजाची गाणी म्हणत वरुणराजाला पावसाकरिता साकडे घालण्यात येत असे, तर शेतकरी धान्य गोळा करून भंडारासुद्धा देतअसे. त्याला शेतकरी पानदेवाचा भंडारा मानत असत; परंतु सद्य:स्थितीत या विज्ञानयुगात पावसाचे अंदाज, आराखडे सूचित करणारे यंत्र निर्माण झाल्यामुळे खेड्यापाड्यातील पावसाला प्रसन्न करण्याकरिता भोळ्या-भाबड्या श्रद्धेची धोंडी, पानराजा आता बासनात गंुडाळला आहे.