शिवभक्तांची वाट खडतर; शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 10:00 AM2019-08-22T10:00:42+5:302019-08-22T10:01:26+5:30
कावडधारी शिवभक्तांचा खरा कस शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत लागणार असून, या मार्गाची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: येत्या २६ आॅगस्ट रोजी शहरात मोठ्या उत्साहात कावड व पालखी उत्सव साजरा केला जाणार आहे. त्या पृष्ठभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित कंत्राटदाराला अकोला ते गांधीग्रामपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २० आॅगस्टची मुदत दिली होती. ही मुदत उलटून गेल्यावरही गांधीग्रामपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती सुरूच असल्याचे बुधवारी पाहावयास मिळाले. हा प्रकार कमी म्हणून की काय, कावडधारी शिवभक्तांचा खरा कस शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत लागणार असून, या मार्गाची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र आहे.
शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वरला श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी गांधीग्राम येथून पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. गांधीग्रामला असंख्य कावडधारी शिवभक्त नदीचे जल आणण्यासाठी रविवारी सायंकाळी रवाना होतात. सोमवारी सकाळी अनवाणी पायी चालत शिवभक्त शहरात दाखल होतात. मागील दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)च्यावतीने अकोला ते अकोट मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात अकोला ते गांधीग्रामपर्यंतचा रस्ता तयार केला जात आहे; परंतु अद्यापही रस्त्याचे काम पूर्णत्वास न गेल्यामुळे कावड व पालखी उत्सवात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. कंत्राटदाराकडून रस्ता दुरुस्तीला विलंब होत असल्याची बाब ध्यानात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गांधीग्रामपर्यंतच्या रस्त्याची पाहणी करून २० आॅगस्टपर्यंत रस्ता दुरुस्तीचे निर्देश दिले होते. ही मुदत संपल्यानंतरही कंत्राटदाराकडून रस्त्याची दुरुस्ती सुरूच असल्याचे दिसून आले.
रस्त्यावर थातूरमातूर ‘पॅचिंग’
शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. बुधवारी खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रस्त्याचे पॅचिंग अतिशय सुमार दर्जाचे असल्यामुळे त्यातील गिट्टीचे बारीक खडे शिवभक्तांसाठी अधिकच त्रासदायक ठरणार आहेत.