पातूर घाटात महामार्गाची चाळणी; खड्यांमुळे अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 06:17 PM2019-11-04T18:17:11+5:302019-11-04T18:17:18+5:30
चिचखेड-बोडखा पातुर घाटातील वळणावर जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत
शिर्ला :पातुर घाटातील वळणावर रस्त्याची चाळणी झाल्याने अपघातात वाढ झाली आहे.मोठमोठ्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा मोठे अपघात होत असल्याने नागरिकांना नाहक आपले प्राण गमवावे लागले आहेत.तसेच काहींना अपंगत्व आले आहे.
चिचखेड-बोडखा पातुर घाटातील वळणावर जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.वाहनधारकांना खड्ड्यातुन मार्ग काढताना त्रास सहन करावा लागत आहे. संततधार पावसामुळे या खड्यांमध्ये पाणी साचल्याने चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे, अनेक मोठे व किरकोळ अपघात या मार्गाने होत आहे. या मार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ मध्ये झाले असून नांदेड येथे केंद्रीय रस्ते महामार्गाचे कार्यालय आहे.रस्त्याची निगा राखण्यासाठी येथे यंत्रणा नसल्याने येणाऱ्या काळात आणखी अपघात होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देउन तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
अकोला ते मेडशी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१वरील खड्डे बुजविण्याचे कंत्राट दिले आहे.पाऊस थांबल्यानंतर काम सुरू होईल.वनविभाग परवानगी देत नसल्याने रस्ता पातुर घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
- रावसाहेब झाल्टे, कार्यकारी अभियंता, अकोला