पातूर बीडीओ, लिपिकावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:18 AM2021-03-06T04:18:35+5:302021-03-06T04:18:35+5:30
अकोला: मानव विकास मिशन योजनेंतर्गत पातूर पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांना एलइडी टीव्ही वाटप करण्यात आले; मात्र ...
अकोला: मानव विकास मिशन योजनेंतर्गत पातूर पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांना एलइडी टीव्ही वाटप करण्यात आले; मात्र एलइडी टीव्ही वाटपासाठी जिल्हा परिषद शिक्षण सभापतींसह शिक्षण समितीच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे यासंदर्भात पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) व संबंधित लिपिकावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत शुक्रवारी देण्यात आले.
मानव विकास मिशन योजनेंतर्गत पातूर पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांना एलइडी टीव्ही वाटप करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागामार्फत एलइडी टीव्ही खरेदी करण्यात आले. जिल्हा परिषद शिक्षण सभापतींसह शिक्षण समिती सदस्यांच्या उपस्थितीत प्राथमिक व माध्यमिक शाळांना एलइडी टीव्ही वाटप करणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आले नसल्याने यासंदर्भात पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व संबंधित लिपिकावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत देण्यात आले.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आलेल्या यादीनुसार प्रस्तावित निधीपैकी काही रक्कम कोरोना संसर्ग उपाययोजनेसाठी कपात करण्यात आली. त्यामुळे यापूर्वीच्या शिक्षण समिती सभेत मंजूर झालेल्या शाळा दुरुस्ती कामांच्या यादीचे पुनर्विनियोजन करण्याचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य रामकुमार गव्हाणकर, पवन बुटे, गणेश बोबडे, रिझवाना परवीन शेख मुख्तार, रंजना विल्हेकर, आम्रपाली खंडारे, प्रगती दांदळे, वर्षा वझिरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग व जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना सायकलींचे
वाटप लवकरच !
विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मंजूर यादीला तांत्रिक मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू असून, ही प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली.