पातूर बसस्थानक बाभळीच्या झाडांच्या विळख्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:57+5:302021-07-05T04:13:57+5:30
पातूर : कोट्यवधींचा खर्च करून दहा एकरांवर उभारलेल्या पातूर बसस्थानकाला बंगाली बाभळींच्या जंगलाने विळखा घातला आहे. अनेक समस्यांचे असलेले ...
पातूर : कोट्यवधींचा खर्च करून दहा एकरांवर उभारलेल्या पातूर बसस्थानकाला बंगाली बाभळींच्या जंगलाने विळखा घातला आहे. अनेक समस्यांचे असलेले आगार प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
अकोला-पातूर महामार्गावरील दहा एकर क्षेत्रावर कोट्यवधी रुपये खर्चून पातूर बसस्थानकाची उभारणी राज्य परिवहन महामंडळाने पातूर तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी दीड दशकापूर्वी करण्यात आली होती. मात्र तो फार्स ठरला असल्याचे विदारक वास्तव आहे. बसस्थानकाच्या परिसरात चहुबाजूंनी बंगाली बाभळींनी परिसर व्यापलेला आहे. बसस्थानकाचे शौचालय आणि मुत्रीघर झाडाझुडपांनी व्यापले आहे. पातूर बसस्थानकवर पातूर शहरातील तथा तालुक्यातील प्रवासी विरळाच फिरकतो. अकोला-नांदेड दरम्यान च्या १६१ क्रमांकाच्या महामार्गावरील लांब पल्ल्याच्या बसेसमधून स्थानिक नागरिकांची अत्यंत थोडक्या प्रमाणात चढउतार होते. पातूर बसस्थानकाचा केवळ बसथांबा म्हणून वापर होतो.
फोटो:
बसस्थानकामधून आगाराची एकही बस धावत नाही!
तालुक्याच्या ऐंशी गावांसाठी असलेल्या बसस्थानकामध्ये स्वतःच्या आगाराची एकही बस पातूर तालुक्यातल्या ग्रामीण भागात धावत नाही. पातूर शहराबाहेर असलेले बसस्थानकाऐवजी जुन्या बसथांब्याचाच वापर प्रवासी करतात. त्यामुळे विविध समस्यांनी ग्रासलेल्या पातूरच्या बसस्थानकामध्ये प्रवासी येतच नसल्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला आहे.