सर्वाेपचारमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाचा रुग्णवाहिकेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 10:43 IST2021-03-16T10:42:54+5:302021-03-16T10:43:04+5:30
Corona Patient dies in ambulance काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णाला रुग्णवाहिकेत एक तास ताटकळत थांबावे लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना साेमवारी घडली.

सर्वाेपचारमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाचा रुग्णवाहिकेत मृत्यू
अकाेला : शहरासह जिल्ह्यात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेत असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. बेड उपलब्ध नसल्यामुळे एका काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णाला रुग्णवाहिकेत एक तास ताटकळत थांबावे लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना साेमवारी घडली. या घटनेची माहिती मिळताच मनपातील विराेधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत खाटांची संख्या वाढविण्याची मागणी केली.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात आली असून, पाॅझिटिव्ह रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत आहेत. साेमवारी सकाळी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात आणले असता, बेड उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णाला रुग्णवाहिकेत तासभर ताटकळत थांबावे लागले. यादरम्यान, रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकाराची मनपातील विराेधी पक्षनेता साजीद खान पठाण यांना माहिती मिळताच त्यांनी सामान्य रुग्णालयात धाव घेतली. या वेळी पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णालयात खाटांची कमतरता असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली.
खाटांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या ध्यानात घेता सामान्य रुग्णालयात खाटांची अपुरी व्यवस्था असल्याची बाब समाेर आल्यानंतर विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे खाटा वाढविण्याची मागणी केली. एप्रिल २०२० मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटा व डाॅक्टरांची संख्या वाढविण्यात आली हाेती, याकडे साजीद खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
जिल्हाधिकाऱ्यांनी बाेलावली बैठक
साजीद खान यांच्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी साेमवारी सायंकाळी तातडीने जिल्हा वैद्यकीय आराेग्य यंत्रणेची बैठक बाेलावली. रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत जिल्हा स्त्री रुग्णालय येथे तातडीने ५० बेडची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
सुविधांचा पत्ता नाही; रुग्णांवर दबावतंत्र
जिल्हा सामान्य रुग्णालयात काेराेनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विलंब केला जात आहे. एकीकडे साफसफाई, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांचा अभाव असताना दुसरीकडे काेराेनातून बरे झालेल्या रुग्णांना डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती हाेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास रुग्ण उपचारासाठी पाठ फिरविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.