रुग्ण संख्या घसरली; ७२ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:26+5:302021-05-25T04:21:26+5:30
अकोला : तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच काेराेना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घसरण झाल्याचे सोमवारी समाेर आले आहे़ जिल्हा ...
अकोला : तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच काेराेना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घसरण झाल्याचे सोमवारी समाेर आले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार शहरातील ७२ जणांना काेराेनाची लागण झाली आहे़ काेराेनाबाधितांचा घसरलेला आकडा पाहता अकाेलेकरांना दिलासा मिळाला आहे़ यादरम्यान, पूर्व व दक्षिण झाेनमध्ये घसरलेली रुग्ण संख्या पाहता हे दोन्ही झोन नियंत्रणात आल्याचे दिसत आहे.
शहरात फेब्रुवारी महिन्यापासून काेराेनाने हाहाकार घातल्याची परिस्थिती होती. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यापासून ते प्रभावी उपाययाेजना राबविण्यात प्रशासनाची यंत्रणा कुचकामी ठरल्याचे चित्र होते. नागरिकांनीदेखील साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष केले होते. मागील तीन महिन्यांपासून शहरात दरराेज किमान अडीचशे ते तीनशेपेक्षा अधिक जणांना काेराेनाची बाधा हाेत असल्याचे अहवालाअंती दिसून येत होते. अशावेळी सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवाल अकोलेकरांसाठी दिलासादायक ठरला. प्रथमच काेराेना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घसरण झाल्याचे दिसून आले़ यामध्ये ७२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.
पूर्व व दक्षिण झाेन नियंत्रित
शहरात दरराेज अडीचशे किंवा तीनशे रुग्ण आढळून येत असतील तर त्यामध्ये प्रत्येकी शंभर रुग्ण हे पूर्व व दक्षिण झाेनमधील होते. या दाेन्ही झाेनमधील रुग्णसंख्या कमी हाेण्याची काेणतीही चिन्हं दिसत नव्हती. सोमवारी प्राप्त अहवालात पूर्व झाेनमध्ये २७ रुग्ण आढळून आले़ तसेच पश्चिम झाेनमध्ये १३, उत्तर झाेनमध्ये १७ व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचे १५ रुग्ण आढळून आले आहेत़
चाचण्यांची संख्या घसरली!
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असतानाच चाचणी करणाऱ्यांच्या संख्येतही घसरण झाल्याचे दिसून येत आहे. काेराेनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्या सुमारे ८९१ जणांनी नाकातील स्त्रावाचे नमुने दिले़ यामध्ये २७८ जणांनी आरटीपीसीआर आणि ६१३ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली़ संबंधितांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत़