सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण नातेवाइकाकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 01:48 PM2019-09-07T13:48:26+5:302019-09-07T13:48:32+5:30
नीलेश साबळे यांच्या डाव्या कानाला गंभीर दुखापत झाली असून, महेंद्र इंगोले नामक सुरक्षा रक्षकाच्या गळ््यालाही मार बसला.
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या जखमी महिलेला पती विनोद दामोदर याने रुग्णालयातच मारहाण केली. दरम्यान, पती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकावरच महिलेच्या पतीने मोटर सायकलच्या चावीने जबर वार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत सुरक्षा रक्षक नीलेश साबळे यांच्या डाव्या कानाला गंभीर दुखापत झाली असून, महेंद्र इंगोले नामक सुरक्षा रक्षकाच्या गळ््यालाही मार बसला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सर्वोपचार रुग्णालयामध्ये अपघात कक्षात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास चौधरी सेवेवर असताना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास एक जखमी महिला त्यांच्याकडे आली. महिलेच्या डोळ््याजवळ झालेल्या जखमेतून रक्तस्राव सुरू असल्याने तिला उपचारासाठी ड्रेसिंगरुममध्ये पाठविण्यात आले. चौकशीदरम्यान डॉक्टरांनी महिला कॉन्स्टेबलच्या उपस्थितीत तिला जखमी झाल्याचे कारण विचारले असता, पतीने मारहाण केल्याची माहिती तिने सांगितली. थोड्याच वेळात महिलेचा पती विनोद दामोदर (रा. राजीव गांधी नगर ) हा ड्रेसिंगरुममध्ये आला व महिलेसोबत वाद घालत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. ड्रेसिंगरुममधून भांडणाचा आवाज आल्याने डॉ. विलास चौधरी यांनी सुरक्षा रक्षकाला बोलवत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; पण हा वाद मिटवण्यासाठी आलेले सुरक्षा रक्षक नीलेश साबळे व महेंद्र इंगोले यांच्यावरच महिलेचा पती विनोद दामोदर याने हल्ला केला. यात त्याने मोटारसायकलच्या चावीने सुरक्षा रक्षक नीलेश साबळे यांच्या डाव्या कानावर वार केला. या घटनेत साबळे यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली, तर सुरक्षा रक्षक महेंद्र इंगोले यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, इतर सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेत विनोद दामोदर याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी डॉ. चौधरी यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विनोद दामोदर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
डॉक्टरांवरील हल्ला थोडक्यात बचावला
पती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या डॉ. चौधरी यांच्यावरच महिलेच्या पतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु सुरक्षा रक्षकांमुळे डॉक्टर थोडक्यात बचावले. या घटनेमुळे येथील डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. यापूर्वीदेखील येथे रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत.