सर्वोपचार रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी रुग्ण वेटिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 11:17 AM2021-09-05T11:17:58+5:302021-09-05T11:18:06+5:30
Patient on waiting for surgery in a Akola GMC hospital शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची नोंद करून त्यांना ठरावीक दिवशी बोलाविण्यात येत आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे. मात्र, नॉनकोविड रुग्णांची स्थिती चिंता वाढवत आहे. सर्वोपचार रुग्णालयात कोविड काळात बंद झालेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, येथेही रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्यांना वेटिंगवर राहावे लागत आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत असल्याने शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची नोंद करून त्यांना ठरावीक दिवशी बोलाविण्यात येत आहे. बाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी हे सोईस्कर असले, तरी येथील डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाल्यानंतर जेवढ्या मनुष्यबळाला मंजुरी मिळाली होती, तेवढ्याच मनुष्यबळावर आजही रुग्णसेवेचा भार आहे. या काळात सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गत दीड वर्षापासून कोरोना आणि आता नॉनकोविडच्या रुग्णांमुळे उपलब्ध मनुष्यबळावरील ताण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोना काळात अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता, हर्निया, ईएनटी आणि इतर शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. त्या आता पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. उपलब्ध मनुष्यबळच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना सर्व तपासण्यानंतर ठरावीक दिवशी बोलविण्यात येत असल्याची माहिती आहे.
स्त्रीरोग विभागावर सहा जिल्ह्यांचा भार
सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालयात अकोल्यासह बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि हिंगोली या जिल्ह्यांतील गर्भवती प्रसूतीसाठी येतात. त्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात ३०० खाटा आहेत. प्रसूतीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने अतिरिक्त २०० खाटा वाढविण्यात आल्या. मात्र, मनुष्यबळाअभावी त्यांचा उपयोग होत नसल्याची माहिती आहे. दुसरीकडे सर्वाेपचार रुग्णालयात ३० खाटांची व्यवस्था असून, येथेही खाटा कमी पडू लागल्या आहेत. खाटा वाढविल्या तरी त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ अपुरे ठरत असल्याची माहिती आहे.
ग्रामीण रुग्णालयावर भरवसा नाही
अकोल्यातील ग्रामीण भागासह शेजारील जिल्ह्यांतही शासकीय रुग्णालये आहेत. या ठिकाणी प्राथमिक उपचार घेतला जातो. मात्र, आजार वाढला किंवा प्रसूतीसाठी स्थानिक वैद्यकीय अधिकारी त्यांना थेट अकोल्यात संदर्भित करतात. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालयावरही भार वाढला आहे.
सीटी स्कॅन, एक्स-रेसाठी गर्दी
शस्त्रक्रियेपूर्वी गरजेनुसार रुग्णांना सीटी स्कॅन, एक्स-रे आणि सोनोग्राफी काढण्यास सांगितले जाते. त्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात सीटी स्कॅन, एक्स-रे आणि सोनोग्राफीसाठी रुग्णांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.