कोरोना पॉझिटिव्ह अहवालानंतरही रुग्ण घेताहेत सेकंड ओपिनियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:33 AM2021-03-13T04:33:19+5:302021-03-13T04:33:19+5:30
गेल्या आठवडाभरात पुन्हा पुन्हा टेस्ट करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आम्हाला कोरोना नाही, हा गैरसमज अत्यंत धोकादायक ...
गेल्या आठवडाभरात पुन्हा पुन्हा टेस्ट करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आम्हाला कोरोना नाही, हा गैरसमज अत्यंत धोकादायक ठरू शकतो. यंत्रणेवर लोक का विश्वास ठेवत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चाचण्यांच्या गैरसमजातून अनेक लोक यंत्रणेशी वाद घालत असल्याचे प्रकारही घडत असून, लोकांनी यंत्रणेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
एखादी व्यक्ती कोणत्याही कोरोना चाचणीत बाधित आढळल्यास त्या व्यक्तीला दुसरी चाचणी करण्याची आवश्यकता नसते. अशा व्यक्तींनी तातडीने विलग होऊन उपचार सुरू करावेत, अन्यथा स्वत:साठी आणि कुटुंबासाठी हे धोकादायक ठरू शकते. काही कारणास्तव तासाभरानंतरची चाचणी निगेटिव्ह येऊ शकते; मात्र आधीची चाचणी बाधित असल्याने अशा व्यक्ती बाधितच असतात.
तज्ज्ञ काय सांगतात?
एखाद्या व्यक्तीची अॅन्टिजेन चाचणी केल्यानंतर ती निगेटिव्ह आली आणि संबंधित व्यक्तीला लक्षणे असतील तर त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते.
एखाद्या व्यक्तीची अॅन्टिजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होते. दुसरी चाचणी करण्याची गरज नसते.
अॅन्टिजेन ही स्क्रीनिंग टेस्ट ३ असून, याची पॉझिटिव्हिटी ही शंभर टक्के असते.
एखाद्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीने या अहवालावर विश्वास ठेवावा. तत्काळ उपचार घेण्यास सुरुवात करावी. उपचारास विलंब झाल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णांनी सेकंड ओपिनियन घेण्याचे टाळावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला