सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टरच्या हलगर्जीने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 04:52 PM2018-07-02T16:52:57+5:302018-07-02T16:55:39+5:30
अकोला - घुसर येथील एका ३२ वर्षीय युवकाची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतकाच्या नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली आहे.
अकोला - घुसर येथील एका ३२ वर्षीय युवकाची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतकाच्या नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली आहे. संबंधित डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
घुसर येथील रहिवासी संतोष उत्तमसिंह लहरिया यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना ३० जूनला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लहरिया यांना प्रचंड त्रास असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची विनंती डॉक्टरांना केली. मात्र, येथील डॉक्टरांनी कामात कुचराई करीत उपचार करण्यास विलंब केला. मृतकाचा भाऊ गजानन लहरिया यांनी डॉक्टरांची भेट घेऊन तातडीने उपचार करण्यास म्हटले असता, डॉक्टरांनी त्यांच्याशी वाद घालत टाळाटाळ केली. डॉक्टरांनी उपचार करण्यास वेळ केल्यामुळे संतोष लहरिया या युवकाचा मृत्यू झाला, अशा आशयाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.