‘रिप्लेसमेंट’च्या नावाखाली रक्तासाठी रुग्णांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 01:13 PM2019-04-08T13:13:12+5:302019-04-08T13:13:35+5:30
अकोला: उन्हाळा म्हटला की रक्त संकलनाचा तुटवडा जाणवतो. रक्ताची चणचण जाणवत असल्याने रक्तपेढ्यांची पंचाईत होते; परंतु हेच कारण समोर करीत काही रक्तपेढ्या ‘रिप्लेसमेंट’च्या नावाखाली रक्त देण्यासाठी रुग्णांची अडवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
- प्रवीण खेते
अकोला: उन्हाळा म्हटला की रक्त संकलनाचा तुटवडा जाणवतो. रक्ताची चणचण जाणवत असल्याने रक्तपेढ्यांची पंचाईत होते; परंतु हेच कारण समोर करीत काही रक्तपेढ्या ‘रिप्लेसमेंट’च्या नावाखाली रक्त देण्यासाठी रुग्णांची अडवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाविद्यालयांना सुट्या तसेच वाढत्या तापमानामुळे रक्तदान शिबिरे बंद झाली आहेत. त्यामुळे रक्त संकलनाचे प्रमाण घटले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत गरजेपेक्षा रक्त संकलन कमी होत असल्याने रक्तपेढ्यांची पंचाईत होत आहे. हे वास्तव असले तरी उपलब्ध रक्तसाठ्यातून गरजूंना रक्त देताना रिप्लेसमेंटच्या नावाखाली रुग्णांची अडवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, जे नियमित रक्तदान करतात, अशा रक्तदात्यांनाही रक्तासाठी रिप्लेसमेंटची अट घातली जात आहे. त्यामुळे रक्तासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना भरउन्हात एका रक्तपेढीतून दुसऱ्या रक्तपेढीत भटकावे लागत आहे. रक्तासाठी रिप्लेसमेंटच्या नावाखाली होणारी अडवणूक ही रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. हा प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
‘रिप्लेसमेंट डोनर’वर बंदी
रिप्लेसमेंट डोनर म्हणजेच प्रोफेशनल (पेड) ब्लड डोनरवर शासनाने बंदी घातलेली आहे. त्याऐवजी रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सांगितल्यानुसार डायरेक्टेड डोनर (रुग्णांचा नातेवाईक किंवा ओळखीतील रक्तदाता) रक्तदान करू शकतो; परंतु रक्तपेढ्यांमध्ये रिप्लेसमेंट डोनर हा शब्द सर्रास उपयोगात आणला जातो.
रक्तासाठी आर्थिक लूट
रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून रक्तपेढ्या रक्तदानासाठी प्रेरित करतात. संकलित रक्ताच्या ‘टेस्टिंग’साठी येणारा खर्च घेणे अपेक्षित आहे; परंतु शहरातील प्रत्येक रक्तपेढीत रक्ताचे दर वेगळे आहेत. त्यातही ज्यांनी रिप्लेसमेंट दिला, त्याला १२०० रुपये प्रतियुनिट, तर ज्यांनी रिप्लेसमेंट नाही दिला, त्यांच्यासाठी तेच रक्त १५०० रुपये प्रतियुनिट अशा दराने विक्री केली जात असल्याची माहिती आहे.
रिप्लेसमेंट डोनर हा शब्दप्रयोग करणे चुकीचे आहे. यावर शासनाने बंदी घातलेली आहे. रक्तपेढीत स्टॉक नसेल तर त्यासाठी रक्तपेढ्या पर्यायी रक्तदात्याची मागणी करू शकतात; परंतु स्टॉक असल्यास रुग्णाला रक्त देणे आवश्यक आहे.
- डॉ. बाळकृष्ण नामधारी, विभाग प्रमुख, शासकीय रक्तपेढी.
प्रत्येक रुग्णामागे रक्तपेढ्या रिप्लेसमेंटची मागणी करीत आहेत. आॅर्गनायझर असल्याने रक्तपेढ्यांना नियमित रक्तदाते उपलब्ध करून दिल्यानंतरही आम्हाला रिप्लेसमेंटची मागणी केली जाते, तर सामान्यांचे काय?
- निखिल खानजोडे, जिल्हाध्यक्ष, राज्य रुग्णसेवा संघटना, अकोला.