गर्भवतीसह रुग्णांना उपचारासाठी बसावे लागले दोन तास ताटकळत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:23 AM2021-09-12T04:23:25+5:302021-09-12T04:23:25+5:30

मळसूर: पातूर तालुक्यातील मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिकांना मुख्यालयी राहण्याची ‘ॲलर्जी’ असल्याचे दिसून येत ...

Patients with pregnancy had to sit for two hours for treatment! | गर्भवतीसह रुग्णांना उपचारासाठी बसावे लागले दोन तास ताटकळत!

गर्भवतीसह रुग्णांना उपचारासाठी बसावे लागले दोन तास ताटकळत!

Next

मळसूर: पातूर तालुक्यातील मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिकांना मुख्यालयी राहण्याची ‘ॲलर्जी’ असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर, परिचारिका अप-डाऊन करीत असल्याने रुग्णांना तासनतास उपचारासाठी ताटकळत बसावे लागत आहे. शनिवार, दि. ११ सप्टेंबर रोजी गर्भवती महिलेसह अनेक रुग्णांना उपचारासाठी तब्बल २ तास ताटकळत बसावे लागले. त्यामुळे रुग्णांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. संबंधित आरोग्य विभागाला अजून किती बळींची आवश्यकता आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावा, या उद्देशाने व परिचारिकास मुख्यालयी राहण्याचे संबंधित वरिष्ठ व प्रशासनाचे आदेश आहेत; परंतु डॉक्टर व परिचारिका यांच्यावर संबंधित वरिष्ठांचा वचक नसल्याने डॉक्टर व परिचारिका मुख्यालयी राहत नसून अप-डाऊन करीत आहे. त्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाही. मळसूर परिसरात बहुसंख्य शेतात शेतमजुरी करणारे असल्याने सकाळी उपचार घेऊन मंजुरी करण्यासाठी शेतात जातात. त्यामुळे सकाळी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची खूप गर्दी असते; मात्र डॉक्टर व परिचारिका वेळेवर उपस्थित नसल्याने रुग्णांना उपचारासाठी तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. संबंधित वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.

--------

नेहमी घडतात प्रकार: वरिष्ठांचे दुर्लक्ष

मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच रुग्णांचा ताटकळत बसावे लागते. हा प्रकार पहिल्यांदाच नव्हे यापूर्वीसुद्धा अनेक वेळा उघडकीस आला आहे. याकडे संबंधित आरोग्य विभागाच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असून, रुग्णांना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

------------------

माझी परीक्षा असल्यामुळे मी बाहेर गावी असून, सद्यस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. इफ्तेकार शेख आहेत.

- डॉ. आसिफ शेख बागवान, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, मळसूर.

---------

माझी गाडी नादुरुस्त झाल्याने मला प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यास उशीर झाला.

- डॉ. इफ्तेकार शेख, प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र, मळसूर.

Web Title: Patients with pregnancy had to sit for two hours for treatment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.