रुग्णाच्या नातेवाइकांची डॉक्टरांना मारहाण, सर्वोपचारमधील डॉक्टरांनी घेतली कामबंदची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 11:53 PM2024-05-03T23:53:59+5:302024-05-03T23:54:47+5:30
अतिदक्षता वाॅर्डामध्ये खदान परिसरातील कैलास डेकी भागात राहणाऱ्या एका रुग्णावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री रुग्ण दगावला.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी उपस्थित डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९:३० ते १० वाजताच्या दरम्यान घडली. यानंतर डाॅक्टरांनी काम बंद करण्याची भूमिका घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अतिदक्षता वाॅर्डामध्ये खदान परिसरातील कैलास डेकी भागात राहणाऱ्या एका रुग्णावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री रुग्ण दगावला. रुग्ण आधीच अत्यवस्थ असल्याने तेथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही दुर्दैवाने रुग्णाचे निधन झाले. त्यामुळे संतापलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी तेथे हजर असलेले डॉ. शाहीद, डॉ. बालाजी लांडगे व डॉ. आशुतोष यांना मारहाण केली. त्यामुळे या मारहाणीमुळे निषेधार्थ जीएमसीतील डॉक्टरांनी रात्री काम बंद करण्याची भूमिका घेतली. या घटनेमुळे इतर रुग्णांच्या उपचारात मात्र अडथळा निर्माण झाला होता. या प्रकरणी जीएमसी प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत पोलिस तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू होती. डॉक्टरांनी संयम बाळगून इतर रुग्णांच्या उपचारात बाधा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.