संचारबंदीमुळे सर्वोपचारमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांची कुचंबणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 04:21 PM2020-03-24T16:21:15+5:302020-03-24T16:21:27+5:30
रुग्णांच्या नातेवाइकांची कुचंबणा झाली असून, त्यांच्यावर नाश्ता व जेवणासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
अकोला : राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ मार्च रोजी जमावबंदी कायदा लागू केला. या निर्णयामुळे सर्वोपचारमधील रुग्णांच्या नातेवाइकांची कुचंबणा झाली असून, त्यांच्यावर नाश्ता व जेवणासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या प्रकाराची दखल घेत सोमवारी आमदार रणधीर सावरकर यांनी रुग्णांच्या नातेवाइकांच्या भेटी घेत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आहे.
जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी जिल्हाभरातूनच नव्हे तर नजीकच्या वाशिम, बुलडाणा तसेच अमरावती जिल्ह्यातूनही रुग्ण दाखल होतात. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारकडून वारंवार दिशानिर्देश दिले जात आहेत. कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी २२ मार्चपासून १४४ कलमान्वये जमावबंदी कायदा लागू केला. परिणामी जीवनावश्यक वस्तूंसाठी किराणा,औषधीसह दुग्धजन्य पदार्थ विक्रीच्या व्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय बंद केले आहेत. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी कुचंबणा झाली आहे. परिसरातील सर्व हॉटेल, खाणावळी, ज्युस, चहा-नाश्त्याची दुकाने बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. हा प्रकार समजताच सोमवारी आमदार रणधीर सावरकर यांनी सर्वोपचार रुग्णालय गाठून रुग्णांच्या नातेवाइकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा
रुग्णालयात भरती रुग्णांसाठी सर्वोपचारकडूनच जेवणाची व्यवस्था केली जाते. अशावेळी त्यांचे नातेवाईक परिसरातील हॉटेल, खाणावळींमध्ये जेवण करतात. तूर्तास नातेवाइकांची गैरसोय होत असल्याने यावर उपाय काढण्यासाठी आ. सावरकर यांनी जिल्हाधिकाºयांसोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान केवळ रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सर्वोपचार परिसरातील शिवभोजन योजना सुरू ठेवण्याची मागणी आ. सावरकर यांनी केल्याची माहिती आहे.