ऑक्सिजन खाटांसाठी रुग्ण दोन ते तीन तास वेटिंगवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 11:45 AM2021-04-24T11:45:53+5:302021-04-24T11:47:55+5:30
Akola GMC : रुग्णांना ऑक्सिजन खाटांसाठी दोन ते तीन तास रुग्णवाहिकेतच ताटकळत बसावे लागत असल्याचे गंभीर चित्र पाहावयास मिळत आहे.
अकोला: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून रुग्णांची ऑक्सिजनच्या खाटांसाठी धावपळ सुरू आहे. खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने बहुतांश रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत आहेत, मात्र या ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन खाटांसाठी दोन ते तीन तास रुग्णवाहिकेतच ताटकळत बसावे लागत असल्याचे गंभीर चित्र पाहावयास मिळत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. यातील बहुतांश रुग्णांना ऑक्सिजन, तर काही रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे, मात्र उपलब्ध सुविधांच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णांना ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरसाठी शोधाशोध करावी लागत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा गरजेनुसार होत नसल्याने परिस्थिती आणखी विदारक होत आहे. ऑक्सिजन अभावी खासगी रुग्णालयातील रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित केले जात आहे. त्यामुळे सर्वाेपचार रुग्णालयावरील रुग्णसेवेचा ताण आणखी वाढला आहे. सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध मनुष्यबळ अपुरे ठरत असून, नव्याने ऑक्सिजन खाटा वाढविण्यासाठी डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करेपर्यंत गंभीर रुग्णांना कोविड वॉर्डाबाहेर रुग्णवाहिकेतच ताटकळत बसावे लागत आहे.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता
खासगी रुग्णालयातून संदर्भित रुग्णांसह जिल्ह्याबाहेरील रुग्णांचा अतिरिक्त ताण कमी न झाल्यास सर्वोपचार रुग्णालयावरील ताण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. परिमामी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवरील मानसिक ताण वाढेल, मात्र हा ताण कमी करण्याऐवजी खासगी रुग्णालयांकडून कोविडचे गंभीर रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास ऑक्सिजन खाटांच्या प्रतीक्षेत कोविडच्या गंभीर रुग्णांची रुग्णालय परिसरात गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
११ केएल दैनंदिन गरज
सर्वोपचार रुग्णालयात अकोल्यासह बुलडाणा आणि वाशिम तसेच नागपूर जिल्ह्यातील रुग्ण दाखल होत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे दिवसाला किमान ११ केएल ऑक्सिजनची गरज भासत आहे, मात्र तुलनेने पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे.
खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविण्यावर भर
जिल्ह्यातील कोविड रुग्णांचा सर्वाधिक भार सर्वोपचार रुग्णालयावर आहे. त्या तुलनेत सर्वोपचार रुग्णालयाला आधीच ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे, मात्र सर्वोपचार रुग्णालयाच्या हिश्शाच्या ऑक्सिजनमधील ५० टक्के ऑक्सिजन खासगी रुग्णालयाकडे वळता करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून होत असल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे.
टँकर पोहोचायला लागतात २४ तास
आधी नागपूरहून ऑक्सिजन लिक्विडचा पुरवठा होत होता. त्यामुळे वेळही कमी लागत होता. मात्र आता नागपूरहून पुरवठा बंद झाल्याने पुण्यातील चाकणहून लिक्विड येते. टँकर अकोल्यात पोहोचायला २४ तास लागतात. हा साठाही सव्वा दिवसात संपून जात असल्याने पुन्हा प्रश्न पडतो, अशी स्थिती आहे.