Corona Cases in Akola : खाटेसाठी रुग्णांची वणवण; पॉझिटिव्ह रुग्ण फिरताहेत रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:08 AM2021-04-29T11:08:01+5:302021-04-29T11:08:18+5:30
Corona Cases in Akola : रुग्णालयांमध्ये खाटाच उपलब्ध नसल्याने कोविड रुग्ण नातेवाईकांसोबत एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात वणवण फिरताना दिसून येत आहेत.
अकोला : कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. ग्रामीण भागासह जिल्ह्याबाहेरील गंभीर रुग्ण ऑक्सिजन खाटांच्या शोधात अकोल्यात येत आहेत, मात्र रुग्णालयांमध्ये खाटाच उपलब्ध नसल्याने कोविड रुग्ण नातेवाईकांसोबत एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात वणवण फिरताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन खाटांची गरज भासत आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यातील ऑक्सिजन खाटांची संख्या अपुरी ठरत असताना ग्रामीण भागासह शेजारील जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात अकोल्यात येत आहेत. अनेक रुग्ण रात्री उशिरा अकोल्यात दाखल हाेतात, मात्र त्यांना खासगी किंवा सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजन खाट उपलब्ध न झाल्यास ते नातेवाईकांसोबत एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात वणवण फिरताना दिसून येत आहेत. या प्रकारामुळे रुग्णांची प्रकृती आणखी गंभीर होत आहे. या परिस्थितीमुळे अनेकांना उशिरा उपचार मिळत आहेत. डॉक्टरांच्या मते गंभीर रुग्णांवर उशिरा उपचार सुरू झाल्यास ते उपचारास प्रतिसाद देत नाहीत, परिणामी अशा रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.
जीएमसीत रुग्ण वेटिंगवर
सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उपलब्ध खाटा अपुऱ्या पडत असून रुग्णांना दाखल होण्यासाठी तीन ते चार तास रुग्णवाहिकेतच वेटिंगवर राहावे लागत आहे.
चाचण्यांमध्ये जातोय रुग्णांचा वेळ
रुग्णालयात ऑक्सिजन खाट मिळविण्यासाठी चार ते पाच तास वणवण फिरल्यानंतर एखाद्या रुग्णालयात खाट मिळाली, तरी रुग्णाच्या इतर चाचण्या आणि दाखल प्रक्रियेत मोठा वेळ जातो. त्यामुळे उपचारास आणखी उशीर होतो.