पातूर, बाळापुरातील १०८ रुग्णवाहिकेची सेवा इतर जिल्ह्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 01:33 PM2020-02-08T13:33:52+5:302020-02-08T13:34:00+5:30
वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांची सेवा ठप्प पडली आहे.
अकोला : कमी वेतनामुळे १०८ रुग्णवाहिकेच्या अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा बंद केली आहे. तर दुसरीकडे नादुरुस्त रुग्णवाहिकांमुळे वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांची सेवा ठप्प पडली आहे. परिणामी पातूर, पिंजर आणि बाळापूर येथील १०८ रुग्णवाहिकांना शेजारील जिल्ह्यांमध्ये सेवा द्यावी लागत आहे. त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील रुग्णसेवेवर होत आहे.
जिल्ह्यात अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट आणि बेसिक लाइफ सपोर्ट अशा दोन प्रकारच्या रुग्णवाहिका सेवा देत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या मदतीने २०१३ मध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी ही सेवा सुरू केली होती. अपघात झाल्यास किंवा दवाखान्यातून जाऊन तत्काळ उपचार घेण्याची गरज भासल्यास १०८ क्रमांकावर कॉल करताच किमान वेळेत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होते; मात्र वाशिम आणि बुलडाण्यासह शेजारील जिल्ह्यातील जवळपास ५० टक्के रुग्णवाहिकांची सेवा ठप्प असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील आपत्कालीन रुग्णांसाठी अकोला जिल्ह्यातील पातूर, पिंजर आणि बाळापूर येथील १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकांची मदत घेतली जाते; परंतु ही मदत घेताना त्याचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील रुग्णसेवेवर होत आहे. अनेकदा या दोन तालुक्यातील रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते.
जिल्ह्यात १२ रुग्णवाहिका
जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या १२ रुग्णसेवेत कार्यरत आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही स्थिती काही प्रमाणात चांगली आहे; मात्र शेजारील जिल्ह्यातील जवळपास ५० टक्के रुग्णवाहिकांची सेवा ठप्प आहे. १०८ रुग्णवाहिकांना जिओ टॅपिंग केले असल्याने जिल्ह्यातील काही रुग्णवाहिकांना शेजारील जिल्ह्यात पाठविण्यात येते.
१०८ रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी आरोग्य विभागामार्फत संबंधित कंपनीला लाखो रुपयांचा निधी दिला जातो; परंतु काही रुग्णवाहिकांची सेवा बंद असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवेसाठी इतर जिल्ह्यात पाठविण्यात येतात. त्याचा थेट प्रभाव जिल्ह्यातील रुग्णसेवेवर दिसून येतो.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला