दिलासादायक: पातूर शहर कोरोनामुक्त; तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 11:02 AM2021-06-30T11:02:35+5:302021-06-30T11:02:43+5:30
Corona Cases : सद्यस्थितीत तालुक्यात केवळ ४ रुग्णांवर उपचार सुरू असून, हे सर्व पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
- संतोषकुमार गवई
पातूर: तालुका सद्यस्थितीत कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून, तालुकावासीयांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण व दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने घसरली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात केवळ ४ रुग्णांवर उपचार सुरू असून, हे सर्व पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहर कोरोनामुक्त झाले असून, शहरात होणारी गर्दी घातक ठरू शकते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यासह तालुक्यात थैमान घातले होते. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत खूप मोठी वाढ पाहायला मिळाली. तालुक्यात तब्बल २,४४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सद्यस्थितीत कोरोनाचा आलेख घसरत असल्याने, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सद्या तालुक्यात केवळ चार जणांवरच उपचार सुरू आहेत. यापैकी खेट्री येथील दोन रुग्ण, तसेच सावरगाव व सस्ती येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
----------------------------
संभाव्य तिसरी लाट रोखण्याचे आव्हान
पॉझिटिव्ह रुग्णसंख्याही नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, संभाव्य तिसरी लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची चिंता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे आरोग्य विभागापुढे तिसरी लाट थोपविण्याचे आव्हान कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर न राहता, सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बॅंकेत होणारी गर्दी ठरू शकते घातक
तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असताना, कोरोनाच्या नावाखाली मुख्य प्रवेशद्वार बंद करून, शहरातील बॅंकेत गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोला-पातुर रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील गर्दी ही कोरोनाचा संसर्ग वाढविण्यासाठी घातक ठरू शकते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घसरली असून, निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, काही नागरिक याचाच फायदा घेत, बाजारपेठ, बॅंकेत आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत असल्याचे दिसून येते. कोरोनाचे संकट कायम असल्याने नागरिकांनी त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावे.
-डाॅ.विजय रामसिंग जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी, पातूर.
पातूर तालुका एकूण रुग्ण: २,४४४
सक्रिय रुग्ण: ४
खेट्री: २
सावरगाव: १
सस्ती: १
पातूर तालुका कोरोनाबाधित
ग्रामीण: २,०१५
शहर: ४२९
कोरोनामुक्त
ग्रामीण: २,०११
शहर: ४२९
मृत्यू
ग्रामीण: ३५
शहर: ०४
उपचार
शहर ००
ग्रामीण: ४