पातूरची मनोरुग्ण महिला नागपुरात सापडली!
By admin | Published: February 17, 2017 02:49 AM2017-02-17T02:49:47+5:302017-02-17T02:49:47+5:30
नागपूर पोलिसांनी महिलेस पातुरात आणून कुटुंबीयांच्या केले स्वाधीन.
पातूर, दि. १६- बाळापूर वेसीजवळील पुलाजवळ राहणारी मनोरुग्ण विवाहिता पाच ते सहा वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. ही महिला नागपुरात सापडली असून तिला १६ फेब्रुवारीला पोलिसांनी पातुरात आणून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
बाळापूर वेसीजवळ राहणारी ३५ वर्षीय पायल प्रभाकर विजयकर ही महिला गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वी घरातून निघून गेली होती. तिचा नातेवाइकांनी शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. १६ डिसेंबर २0१६ रोजी ती बेवारस भटकत असताना नागपूर पोलिसांना आढळली. पोलिसांनी तिला नागपूर येथील शासकीय प्रियदर्शनी महिला वसतिगृहात दाखल केले. त्यानंतर जवळपास दोन महिने तिच्यावर उपचार करून तिच्याकडून कुटुंबीयांची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. वसतिगृहातील केअर टेकर महिला रेणू रामेश्वर मसराम यांना ती पातूरची असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने पायल विजयकर यांना गुरुवारी पातुरात आणले. पातूर पोलिसांच्या मदतीने तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या महिलेला एक १८ वर्षांचा मुलगा व दोन मुली आहेत. या प्रकरणी पोकॉ भूषण व मनीष घुगे यांनी सहकार्य केले.