पवार नव्हे, आंबेडकरच खोटे - राष्ट्रवादी नेत्यांचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:49 PM2018-09-26T13:49:51+5:302018-09-26T13:51:26+5:30

पवार खोटे बोलत आहेत, अशी टीका करणारे भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर हेच महाखोटे असल्याचा पलटवार माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

 Pawar is not, but Ambedkar laying - NCP leaders | पवार नव्हे, आंबेडकरच खोटे - राष्ट्रवादी नेत्यांचा पलटवार

पवार नव्हे, आंबेडकरच खोटे - राष्ट्रवादी नेत्यांचा पलटवार

Next

अकोला : मी शरद पवारांच्या नव्हे, काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलो होतो. पवार खोटे बोलत आहेत, अशी टीका करणारे भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर हेच महाखोटे असल्याचा पलटवार माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
माजी खासदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका कृतघ्नपणाचा कळस असल्याचे सांगत, सन १९८४, १९८९, १९९१ व १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत अकोला मतदार संघातून सातत्याने अ‍ॅड.आंबेडकर यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर १९९८ मध्ये शरद पवार यांनी राज्यात दलित ऐक्य घडवून आणले आणि ‘आरपीआय’वेगवेगळ्या गटाच्या चारही नेत्यांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणले. त्यावेळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या दरबारात शरद पवारांच्या शब्दाला मोठे वजन होते, ही बाब राज्यातील सर्वांनाच माहीत आहे, असे गुलाबराव गावंडे यांनी सांगितले. राज्यात शरद पवारांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राम पंडागळे, जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये यांच्यासारखे अनेक बौद्ध समाजाचे नेते आमदार झाले, तसेच मुस्लीम व विविध समाजाला विधान परिषदेवर संधी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर केले. शरद पवार जात-पात मानत नसून, मागासवर्गीयांना मोठे करण्याची त्यांची तळमळ राहिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य, गरिबांचे नेते असलेले शरद पवार यांना जातीयवादी म्हणणे योग्य नाही, असे गुलाबराव गावंडे म्हणाले. मुळात अ‍ॅड.आंबेडकर यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडीच करायची नाही; मात्र आंबेडकरी जनतेचा दबाव असल्याने, शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेचे गुºहाळ सुरू ठेवायचे आणि शेवटी राज्यात भाजपाचा अप्रत्यक्षपणे फायदा करून द्यायचा अशीच त्यांची भूमिका आहे, असा आरोपही गुलाबराव गावंडे यांनी केला. यावेळी माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, प्रा. विश्वनाथ कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभय्या गावंडे, श्रीकांत पिसे पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती पुंडलीकराव अरबट, डॉ.आशा मिरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, दिलीप आसरे उपस्थित होते.


अ‍ॅड. आंबेडकर भाजपाची मध्यस्थी करणारे!
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर भाजपाला मदत करणारे मध्यस्थी आहेत. राज्यात भाजपाला मोठे करण्याचे काम ते करीत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव गावंडे यांनी केला.

बौद्ध समाजाला आमदार बनवू शकले नाही!
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर ज्या समाजाच्या शक्तीवर राजकारण करतात, त्या बौद्ध समाजाला अद्यापही आमदार बनवू शकले नाही, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही, असा आरोपही गुलाबराव गावंडे यांनी केला. अ‍ॅड. आंबेडकरांची ‘लाइफ लाइन’ केवळ अकोला जिल्हा परिषद असून, ती कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्या घेऊनच अस्तित्वात असते. जिल्हा परिषदेत भारिप-बमसंची स्वबळावर कधीही सत्ता नव्हती, आजही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा केवळ शरद पवार यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेमुळेच मिळतो, असा टोलाही गुलाबराव गावंडे यांनी लगावला.

जिल्हा परिषदेत ‘भारिप’ची सत्ता कोणामुळे?
धर्मनिरपेक्ष भूमिका ठेवून भाजपासोबत न जाता जिल्हा परिषदेत आम्ही भारिप-बमसंसोबत राहिलो आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भारिप-बमसंची सत्ता कोणामुळे आहे, हे जिल्हावासीयांना माहीत आहे, असे माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी सांगितले. अ‍ॅड. आंबेडकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी शरद पवार अकोल्यात आले होते, तेव्हा त्यांनी अ‍ॅड. आंबेडकर पराभूत होता कामा नये, असा सल्ला आम्हाला दिला होता, असेही बिडकर यांनी सांगितले.

आंबेडकर ओवेसीसोबत कसे?
धर्मनिरपेक्ष असलेले अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर ओवेसीसोबत कसे बसतात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. आशा मिरगे यांनी यावेळी उपस्थित केला. अ‍ॅड. आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका योग्य नसल्याचेही त्या म्हणाल्या.

 

Web Title:  Pawar is not, but Ambedkar laying - NCP leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.