वेतन आयोग: अकोल्यातील डाक सेवकांनी उपसले उपोषणाचे अस्त्र
By atul.jaiswal | Published: November 9, 2017 05:55 PM2017-11-09T17:55:09+5:302017-11-09T17:58:27+5:30
अकोला : ग्रामीण भागातील डाकसेवकांना कमलेशचंद्र वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या सभासदांनी गुरुवार, ९ नोव्हेंबर रोजी उपोषणास प्रारंभ केला.
अकोला : ग्रामीण भागातील डाकसेवकांना कमलेशचंद्र वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या सभासदांनी गुरुवार, ९ नोव्हेंबर रोजी उपोषणास प्रारंभ केला. हे उपोषण ९ व १० नोव्हेंबर असे दोन दिवसीय राहणार आहे. ग्रामीण डाक सेवकांच्या वेतनासाठी शासनाने कमलेशचंद्र आयोग गठीत केला होता. या आयोगाने आपला अहवाल सादर करून एक वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही तो अद्यापपर्यंत लागू करण्यात आला नाही. यासाठी संघटनेने आॅगस्ट महिन्यात संपाचे हत्यार उपसले होते. संपकाळात डाक विभागाचे सचिव यांनी संघटनेच्या राष्ट्रीय सचीवांना लिखित आश्वासन दिल्यामुळे संघटनेने संप मागे घेतला. त्यानंतरही वेतन आयोग लागू करण्यास विलंब होत आहे. वेतन आयोग लागू करण्यासाठी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठविले आहे. ग्रामीण डाक सेवकांना हा वेतन आयोग तातडीने लागू करावा, यासाठी दोन दिवसीय उपोषण सुरु करण्यात आले आहे. अकोला येथील मुख्य डाक घरासमोर सुरु असलेल्या या उपोषणात संघटनेचे सचिव एच. बी. फाटकर, अध्यक्ष डी. पी. तायडे, आर. आर. थोरात, व्ही. एस. निकोले, एम. के. शर्मा, राहुल वाहुरवाघ, आदित्य भालतिलक, सागर गव्हाळे, योगेश जवंजाळ, इंगळे, पी. पी. बोळे, दिलीप सिरसाठ, आर. डी. नांदुरकर, के. के. पटेल, भालेराव, दिपक वाडेकर, विनय शेळके, एस. एम. गोपनारायण, तुळशीराम बोबडे, जानोरकर, बागडे, ठाकूर, पैजवार आदी कर्मचारी उपस्थित होते.