चार महिन्यांचे वेतन द्या; अन्यथा बेमुदत काम बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 02:18 PM2020-02-12T14:18:58+5:302020-02-12T14:19:17+5:30
थकीत वेतन द्या, अन्यथा बेमुदत काम बंदचा इशारा मंगळवारी कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर गत चार महिन्यांपासून विनावेतन रुग्णसेवा देत आहेत. वेतन नाही, तर कुटुंबाचा गाडा चालवणे शक्य नाही. त्यामुळे आमचे थकीत वेतन द्या, अन्यथा बेमुदत काम बंदचा इशारा मंगळवारी कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी दिला.
सर्वोपचार रुग्णालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे आॅक्टोबर २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंतचे वेतन थकीत आहे. गत चार महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने डॉक्टरांच्या कुटुंबाचा बजेट कोलमडला आहे. थकीत वेतनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे वारंवार मागणी केली, तरी प्रशासनाकडून सकारात्मक उत्तर मिळत नसल्याने मंगळवारी ४० कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. थकीत वेतनाच्या मागणीसाठी सकाळीच निवासी डॉक्टरांनी अधिष्ठातांचे दालन गाठले. यावेळी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत वेतन बँक खात्यात जमा होणार, असे आश्वासन दिल्याने डॉक्टरांनी संप मागे घेतला. दिलेल्या मुदतीत वेतन न मिळाल्यास बेमुदत काम बंदचा इशारा यावेळी डॉक्टरांनी दिला.
निधीअभावी रखडले वेतन
निवासी डॉक्टरांच्या वेतनासाठी निधी कमी पडत असल्याने आॅक्टोबर महिन्यात शासनाकडे ८.५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. हिवाळी अधिवेशनात निधीला मंजुरीही मिळाली होती; परंतु महाविद्यालयाला अद्यापही निधी मिळाला नव्हता. हा निधी दोन दिवसांपूर्वीच आल्याची माहिती जीएमसी प्रशासनाने दिली.
प्रहारच्या मध्यस्थीने आंदोलन मागे
निवासी डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत असताना प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांची भेट घेतली. थकीत वेतनासंदर्भात अधिष्ठातांसोबत चर्चेनंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अधिष्ठातांकडून लेखी आश्वासन घेत निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आवाहन केले.
वेतनासाठी कालच निधी आला. त्यामुळे वेतनाची देयके काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात निवासी डॉक्टरांना कळविले होते; मात्र ते संपावर गेले. त्यामुळे त्यांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेशही दिला आहे.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला