४९ लाख रूपये भाडे भरूनही परिवहन मंडळाच्या निळ्या बसेस ग्रामीण भागात धावेनात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 02:20 PM2018-11-05T14:20:16+5:302018-11-05T14:20:22+5:30
४९ लाख रूपये भाडे परिवहन महामंडळाकडे भरूनही अनेक गावांमध्ये एसटी बस वाहतूक होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: राज्य शासनाच्या मानव विकास कार्यक्रमातर्गंत ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थिनींना इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेता यावे, या दृष्टीकोनातून गाव ते शाळेदरम्यान एसटी बस वाहतूकीची सुविधा उपलब्ध केली. त्यासाठी ४९ लाख रूपये भाडे परिवहन महामंडळाकडे भरूनही अनेक गावांमध्ये एसटी बस वाहतूक होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ग्रामीण भागात एसटी बसेस धावत नसल्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
बेटी बचाव, बेटी पढाव...असा संदेश देणाऱ्या राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्वच मुलींना शिक्षण घेता यावे. या दृष्टीकोनातून मानव विकास कार्यक्रमातर्गंत मोफत सायकलींची योजना सुरू केली. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने गाव ते शाळेपर्यंत मुलींना बसगाडीची सुविधा मिळावी आणि मुलींना शाळेत जाता यावे. यासाठी गाव ते शाळेदरम्यान निळ्या रंगाच्या एसटी बस वाहतूक सुरू केली. त्यासाठी शासनाच्या जिल्हा मानव विकास समितीच्या मार्फत २१५ दिवसांसाठी अकोला परिवहन महामंडळाला निळ्या बसगाड्यांच्या फेºयांसाठी भाडे म्हणून सात तालुक्यांसाठी प्रत्येकी ७.४ लाख रूपये असे एकूण ४९ लाख रूपये दिले आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये गाव ते शाळा निळ्या बसगाड्या धावतच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निळ्या बसगाड्या येत नसल्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. ही गंभीर बाब असल्याने, जिल्हा मानव विकास समितीने नाराजी व्यक्त करीत, निळ्या बसेस नियमित आणि वेळेवर गाव ते शाळादरम्यान फेºया करतील. या दृष्टीने परिवहन विभागाने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.