रिकव्हरीच्या पाच लाखांचा भरणा; विभागीय खातेनिहाय चौकशीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:55+5:302021-06-24T04:14:55+5:30
खेट्री: पातूर तालुक्यातील सावरगाव झरंडी ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये सचिव पी. पी. चव्हाण यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न ...
खेट्री: पातूर तालुक्यातील सावरगाव झरंडी ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये सचिव पी. पी. चव्हाण यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून, त्यांनी १० लाख ३४ हजार रुपयांचा अपहार केल्यामुळे त्यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांची विभागीय खातेनिहाय चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, अपहार केलेल्या १० लाख ३४ हजार रुपयांपैकी रिकव्हरीचे सचिवाने पाच लाख रुपयांचा भरणा केला आहे.
सावरगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन तसेच झरंडी ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेले सचिव पी.पी.चव्हाण यांनी पाणी फाऊंडेशनच्या मिळालेल्या १८ लाखांचा पारितोषक धनादेशाच्या रकमेमध्ये कुठल्याही प्रकारचे काम न करता कागदोपत्री काम दाखवून अपहार केल्याचा आरोप सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार बळीराम ताले यांनी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन केला. कारवाई होत नसल्याने ताले यांनी दि. १० मे रोजी पातूर येथील पं.स.च्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ताले यांनी थेट अमरावती विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. सचिव पी. पी. चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यास गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवेदनातून केला होता. या प्रकरणाची दखल अमरावती विभागीय आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्या आदेशानुसार सचिव पी. पी. चव्हाण यांचा दोषारोप १ ते ४ चा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहेत.
-----------------------
या प्रकरणात दोषारोप १ ते ४ चा प्रस्ताव सादर करणेबाबत पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत, तसेच विभागीय खातेनिहाय चौकशी झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
-सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोला.
-----------------------
विभागीय खातेनिहाय चौकशी प्रस्तावित केली आहे. विभागीय चौकशी झाल्यानंतर रिकव्हरीची रक्कम व्याजासह वसूल करून कारवाई करण्यात येईल, तसेच सचिवाने चार लाखाच्यावर रिकव्हरीच्या रकमेचा भरणा केला आहे.
-राहुल शेळके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग अकोला.
-------------------------