ऑनलाइन प्रणालीद्वारे टॅक्सचा भरणा; अकोलेकरांमध्ये निरुत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 01:53 PM2020-02-25T13:53:46+5:302020-02-25T13:54:01+5:30
वसुली निरीक्षकांकडूनही ‘पॉस’ मशीनचा वापर केला जात नसल्याची माहिती आहे.
अकोला : सर्वसामान्य नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा थेट घरबसल्या करता यावा यासाठी महापालिका प्रशासनाने आॅनलाइन प्रणाली विकसित केली. या प्रणालीकडे अकोलेकरांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान, या प्रणालीचा वापर न करणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन ‘पॉस’ मशीनद्वारे कराचा भरणा करण्याचे वसुली निरीक्षकांना निर्देश होते. ‘पॉस’ मशीनच्या वापरामुळे मालमत्ता कराची पावती पुस्तके कालबाह्य करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र खुद्द वसुली निरीक्षकांकडूनही ‘पॉस’ मशीनचा वापर केला जात नसल्याची माहिती आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कर विभागाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. काही विशिष्ट प्रभागातील नागरिकांजवळून कर वसुली न करता ती दडवून ठेवण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकारामुळे वसुली निरीक्षकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली होती. २०१६ उजाडेपर्यंत शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न झाल्यामुळे प्रशासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अर्थातच त्याचा परिणाम शहर विकासावर झाला. २०१३ पर्यंत मालमत्ता कर विभागावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे या विभागाचा पदभार सांभाळणाºया अधिकाऱ्यांनी निव्वळ स्वत:च्या तुुंबड्या भरण्याचे उद्योग केले. या सर्व बाबींना पूर्णविराम देण्यासाठी महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर विभागाची गाडी रुळावर आणण्यासाठी विविध उपाय केले. ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर संबंधित स्थापत्य नामक एजन्सीने अकोलेकरांना आॅनलाइन प्रणालीद्वारे घरबसल्या मालमत्ता कराचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ज्या नागरिकांना या प्रणालीअंतर्गत कर जमा करता येत नसेल त्यांच्यासाठी घरपोच ‘पॉस’ मशीन पाठवून त्याद्वारे कराचा भरणा करण्याची सोय केली. मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित देयकांचे वाटप, कराचा भरणा करण्याच्या आदी प्रक्रियेला दोन वर्षांचा कालावधी होत आहे. यादरम्यान, नागरिकांनी आॅनलाइन प्रणालीच्या वापराकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे.
‘पॉस’ मशीनचा सोयीनुसार वापर
मनपा प्रशासनाने ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर कर वसुली विभागाच्या दप्तरी ३२ हजार मालमत्तांची नोंदच नसल्याचे उघडकीस आले होते. अशा मालमत्तांची नोंद करून त्यावर कर आकारणी केल्यानंतर पावती पुस्तिका कालबाह्य करण्याच्या उद्देशातून ‘पॉस’ मशीनचा वापर बंधनकारक करण्यात आला. या मशीनच्या वापरामुळे थकीत कराचा भरणा करताना कोणतीही लबाडी केल्यास त्याची नोंद संगणकाद्वारे निदर्शनास येईल; परंतु वसुली निरीक्षक या मशीनचा सोयीनुसार वापर करीत असल्याची माहिती आहे.
मालमत्ताधारकांनी स्वत:हून पॉस मशीनचा आग्रह धरण्याची अपेक्षा आहे. या मशीनचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर व्हावा, यासाठी वसुली लिपिकांना सूचना दिल्या आहेत. आॅनलाइन प्रणालीचा वापर केल्यास थक बाकीसंदर्भात कोणाचाही गोंधळ उडणार नाही.
- विजय पारतवार, कर अधीक्षक, मनपा