सेंद्रिय शेतीच्या वाढीसाठी पीडीकेव्हीने बनविले ‘मॉडेल’

By Admin | Published: August 21, 2015 12:47 AM2015-08-21T00:47:17+5:302015-08-21T00:47:17+5:30

सेंद्रिय खत व गोबर गॅसची निर्मिती.

PDKV's 'Model' for organic farming | सेंद्रिय शेतीच्या वाढीसाठी पीडीकेव्हीने बनविले ‘मॉडेल’

सेंद्रिय शेतीच्या वाढीसाठी पीडीकेव्हीने बनविले ‘मॉडेल’

googlenewsNext

विवेक चांदूरकर/ अकोला: सेंद्रिय बियाणे, नैसर्गिक खत आणि गोबर गॅसच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीकडे शेतकर्‍यांचा कल वाढावा, याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने विशेष मॉडेल तयार करण्यात आले आहे. गावोगावी शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन तसेच अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनही शेतकर्‍यांपर्यंत हे मॉडेल पोहोचविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत आहे. विद्यापीठात शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता मॉडेल तयार करण्यात आले असून, यामध्ये शेण व काडी-कचर्‍यापासून सेंद्रिय खत कसे तयार करायचे व त्याचा वापर कसा करायचा, याची माहिती शेतकर्‍यांना देण्यात येते. शेणापासून गोबर गॅस कसा तयार करायचा, याचेही प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखविण्यात येते. नाडेफ पद्धतीनुसार, जमिनीच्या वर १२ फूट लांब व पाच फूट रुंद असे टाके तयार करण्यात आले असून, यामध्ये शेतकरी शेतात फेकून देत असलेला काडी-कचरा, गवत, शेण व मातीपासून खत तयार करण्यात येते. जमिनीमध्ये खड्डा करून काडी-कचरा, शेण व मातीपासून खत तयार करण्यात येते. सेंद्रिय शेतीबाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती व्हावी याकरिता सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पेरणीपासून तर शेतमालाच्या विक्रीपर्यंतचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. मातीमधील अन्नद्रव्यांचा नाश होऊ नये व सुपिकता कायम राहावी याकरिता शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. त्याकरिता विद्यापीठाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीची माहिती व्हावी याकरिता खत निर्मिती व गॅस बनविण्याचे मॉडेल तयार करण्यात आले असल्याचे कृषि विद्यापीठाचे संशोधक डॉ. विनोद खडसे यांनी सांगीतले.

*कमी श्रमात, कमी शेणात मुबलक गॅस

        गोबर गॅस ही संकल्पना तीस वर्षांपूर्वीपासून राज्यात अवलंबविण्यात येत आहे; मात्र यामध्ये शेण अधिक प्रमाणात लागत होते. दररोज मिश्रण तयार करण्याकरिता एक ते दोन तास श्रम करावे लागत होते. त्यामुळे ही संकल्पना रुजली नाही. विद्यापीठातील संशोधक डॉ. विनोद खडसे यांनी कमी श्रमात व कमी शेणात जास्त गॅस तयार करण्याचे मॉडेल विकसित केले आहे. यामध्ये एकदा शेण टाकले की आपोआप गॅस तयार होतो व पाच ते सहा सदस्य असलेल्या कुटुंबासाठी संपूर्ण गॅस मिळू शकतो, असा दावा डॉ. खडसे यांनी केला आहे.

Web Title: PDKV's 'Model' for organic farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.