अकोट परिसरात अतिवृष्टीमुळे शेंगाला फुटले कोंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:24 AM2021-09-16T04:24:35+5:302021-09-16T04:24:35+5:30
अकोटः संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच शेतातील मूग, उडीद हातचे गेले ...
अकोटः संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच शेतातील मूग, उडीद हातचे गेले असून, कपाशीची बोंडे सडली आहेत. तसेच सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामातील पिके बुडाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
तालुक्यात संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शहरी भागातील बाजारपेठ विस्कळीत झालीच, तर नदीनाल्यांना आलेल्या पुरांमुळे काठालगतच्या जमीन खरडून गेल्या आहेत. शेतातील पिके पाण्याखाली आली आहेत. शेतरस्ते चिखलमय झाल्याने शेतात ये-जा करता येत नाही. अशातच अतिपावसामुळे उभ्या पिकाच्या शेंगांना कोंब फुटल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (फोटो)
-----------------
या भागात सर्वाधिक नुकसान
तालुक्यातील पिंप्री खुर्द, अकोलखेड, आसेगाव बाजार, सावरा, मुंडगाव आदीसह सर्वच परिसरातील उडीद, मूग, सोयाबीनचे पिके सडून गेली आहेत. पावसामुळे परिसरातील कपाशी पिवळी झाली असून, पानगळ सुरू झाले आहे. अतिपावसामुळे शेतातच शेंगांना कोंब फुटल्याचे दिसून येत आहे.
----------------
अतिवृष्टीमुळे शेतीचे खूप नुकसान झाले. त्यामुळे शेत पेरणीसाठी केलेले खर्च निघण्याची शक्यता कमीत आहे. शेतात पाणी साचले आहे, तर घराची पडझड होत आहे.
-संजय रेळे, शेतकरी वडाळी सटवाई
-----------------------
सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनची पाने पिवळी पडून शेंगानाही कोंब फुटले आहेत. त्यामुळे उत्पादनात घट येणार असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
-सूरज शेंडोकार शेतकरी नंदीपेठ अकोट
-------------------
शेतातील कडधान्याची पिके कामातून गेली. कपाशीला बोंड पक्की असताना संततधार पावसामुळे बोंड्या सडक्या होत आहेत.
-ज्ञानेश्वर मानकर शेतकरी पिंप्री खुर्द
-------------------------
घराची भिंत कोसळली
संततधार पावसाने सर्वच पाणी साचत आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. शेतातील काम ठप्प पडली आहेत. शेतकरी, शेतमजूर घरीच आहे.दरम्यान अतिवृष्टीमुळे वडाळी सटवाई येथील गणेश अरुणराव गडम याचे राहत्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र घरातील सामानाची नासधूस झाली आहे.