सेवानिवृत्तीच्या दिवशी शिपायाची गावातून मिरवणूक काढून निरोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:12 PM2018-10-01T13:12:08+5:302018-10-01T13:15:33+5:30
सेवानिवृत्तीच्या दिवशी शाळेचे विद्यार्थी व मुख्याध्यापकाने घरापासून ते शाळेपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढून त्याच्या कार्याचा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने सन्मान केला.
अकोला : शिपाई... आपल्या दृष्टिकोनातून एक चतुर्थश्रेणी कर्मचारी. वरिष्ठांनी वाटेल ते सांगितलेले काम निमूटपणे पार पाडणारा हा शिपाई. त्याच्या वाट्याला सन्मानापेक्षा उपेक्षाच अधिक. असाच एक शिपाई ३0 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाला; परंतु त्याचा सेवानिवृत्तीचा दिवस चिरस्मरणात राहील, असाच होता. सेवानिवृत्तीच्या दिवशी शाळेचे विद्यार्थी व मुख्याध्यापकाने घरापासून ते शाळेपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढून त्याच्या कार्याचा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने सन्मान केला.
बार्शीटाकळी तालुक्यातील कोथळी ८00 लोकवस्तीचे गाव. गावात आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आहे. शाळेत ३0 जणांचा स्टाफ आहे. या शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करणारे बी.जी. खुळे हे ३0 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. एवढे वर्ष त्यांनी शाळेसाठी सेवा दिली. सांगेल ते काम केले. येणाऱ्या-जाणाºयांना खुर्ची, प्यायला पाणी, शाळेची स्वच्छता, मुख्याध्यापक, शिक्षकांनी सांगितलेली शैक्षणिक कामे केली. विद्यार्थ्यांना शिक्षकांपेक्षाही अधिक आपलासा वाटणारा व्यक्ती म्हणजे शिपाईच. कारण शाळा सुटताना शेवटची घंटा वाजविणाºया शिपायाकडेच आपले लक्ष असते. या शिपायाचाही सन्मान व्हावा, या दृष्टिकोनातून शाळेचे मुख्याध्यापक संतोष काळपांडे यांनी शिपाई बी.जी. खुळे यांना आगळा-वेगळा निरोप देण्याचा उपक्रम शाळेत घेतला. शिपाई खुळे यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांची घरापासून ते शाळेपर्यंत कारमध्ये बसवून लेजीम पथक, ढोल-पथकाच्या तालात गावातून मिरवणूक काढली. त्यांचे सारथ्य मुख्याध्यापक संतोष काळपांडे यांनी केले. शाळेची पहिली घंटा मुख्याध्यापक यांनी वाजविली आणि सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांनी शिपाई खुळे यांचा सत्कार केला. या सत्कारामुळे खुळे भारावून गेले होते. उपेक्षित शिपायाला सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळालेला सन्मान पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. (प्रतिनिधी)