धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस १९ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:51 PM2018-12-14T12:51:28+5:302018-12-14T12:52:25+5:30
वाहन कर्ज घेतल्यानंतर त्याच्या परतफेडीसाठी दिलेला १४ लाख रुपयांचा धनादेश अनादरित झाल्याने आरोपी भाऊराव पावसाळे यास प्रथमश्रेणी न्यायालयाने गुरुवारी १९ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
अकोला: निशांत मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी येथून २१ लाख रुपयांचे वाहन कर्ज घेतल्यानंतर त्याच्या परतफेडीसाठी दिलेला १४ लाख रुपयांचा धनादेश अनादरित झाल्याने आरोपी भाऊराव पावसाळे यास प्रथमश्रेणी न्यायालयाने गुरुवारी १९ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. यासोबतच सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सदरचा दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
निशांत पतसंस्थेच्या मुख्य शाखेतून भाऊराव पावसाळे रा. कौलखेड यांनी २१ लाख ९८ हजार ५६८ रुपयांचे कर्ज वाहन विकत घेण्यासाठी घेतले होते. या कर्जाच्या रकमेवर वाहन खरेदी केल्यानंतर सदरचे वाहन त्याने नांदेड महानगरपालिका येथे सिटी बस म्हणून कंत्राटी पद्धतीने चालविण्याकरिता दिले होते. सदरच्या वाहन कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी पावसाळे यांनी निशांत पतसंस्थेला नागपूर नागरी सहकारी बँक लिमिटेड नागपूर शाखा अकोलाचा १४ लाख रुपयांचा धनादेश ११ आॅगस्ट २०११ रोजी दिला होता; मात्र सदरचा धनादेश अनादरित झाल्यानंतर निशांत पतसंस्थेने भाऊराव पावसाळेविरुद्ध कलम १३८ निगोशियबल कायद्याच्या अंतर्गत न्यायालयात तक्रार दिली. यावर आरोपीने बचाव करताना तो स्वत: हे कर्ज भरण्यास जबाबदार नसून, नांदेड महापालिका जबाबदार असल्याचे न्यायालयासमोर सांगितले; मात्र न्यायालयाने साक्ष-पुरावे तपासले असता पाचवे प्रथमश्रेणी न्यायाधीश यांनी आरोपी भाऊराव पावसाळे यास सहा महिने कारावासची शिक्षा सुनावली. यासोबतच १९ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दंडाची रक्कम निशांत पतसंस्थेला देण्याचा आदेश दिला आहे. ही रक्कम न भरल्यास आणखी तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी निशांत पतसंस्थेच्यावतीने अॅड. श्याम खोटरे व अॅड. अश्विन काळे यांनी कामकाज पाहिले.